नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या अविस्मरणीय उपक्रमांतर्गत भारतीय हवाई दलाने १ ऑगस्ट २०२१ ला नवी दिल्ली येथील हवाई दलाच्या तळावरून लष्कराच्या तिन्ही दलातील महिलांच्या गिर्यारोहक चमूला गिर्यारोहण मोहिमेसाठी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते.
या महिला गिर्यारोहकांच्या चमूने १५ ऑगस्ट २०२१ रोजी माउंट मनिरंग हे २१,६२५ फूट उंचीचे शिखर सर केले. माऊंट मनिरंग हे हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक उंच शिखरांपैकी एक असून ते किन्नौर आणि स्पिती जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या शिखराजवळील मनिरंग खिंड म्हणजे गाडीयोग्य रस्ता होण्यापूर्वी स्पिती आणि किन्नौर यांच्या दरम्यानच्या व्यापारी दळणवळणासाठीचा मार्ग होता. या पंधरा सदस्यीय महिला गिर्यारोहक चमूचे नेतृत्व भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर भावना मेहरा यांनी केले. चमूतील विंग कमांडर भावना मेहरा , लेफ्टनंट कर्नल गीतांजली भट , विंग कमांडर निरुपमा पांडे, विंग कमांडर व्योमिका सिंग, कमांडर ललिता मिश्रा, मेजर उषा कुमारी, मेजर सौम्या शुक्ला, मेजर वीनू मोर, मेजर रचना हुडा, लेफ्टनंट कमांडर सायनो विल्सन, आणि फ्लाईट लेफ्टनंट कोमल पाहुजा या सदस्यांनी शिखर सर करून शिखराच्या माथ्यावर तिरंगा फडकवला.