मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा व संशोधन तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार करण्यात आले. हॉटेल ताजमध्ये बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सांमजस्य करार करण्यात आले.
यावेळी बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखालील बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ, बेल्जियमचे भारतातील राजदूत, अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते. देशातील नामवंत कंपन्यांचे मुख्य कार्यकारी आधिकारी आणि भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचे प्रतिनिधी यांनी सामंजस्य करारवर स्वाक्षरी केल्या.
बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा व संशोधन आदी क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी १२ सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य करारामुळे बेल्जियमशी मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.