मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खान अकॅडमीच्या स्वाती वासुदेवन, शोभना मित्तल, श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे प्रसन्ना प्रभू व मनीष बादियानी तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर डॉ.परदेशी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करणे, त्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षित करणे या दिशेने हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या सहकार्याने राज्यातील १५० शाळांमध्ये आधुनिक, अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित केली जाईल. तर खान अकॅडमीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाने मराठी व इंग्रजी भाषांमध्ये दर्जेदार अध्ययन कार्यक्रम तयार केला जाणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यास मदत होईल व इतर शाळांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, “श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेने यापूर्वीही पाणी व्यवस्थापन व शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र शासनासोबत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आता शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग एक नवा आदर्श ठरेल.”
‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’
खान अकॅडमी यांच्याशी कराराअंतर्गत ‘डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविला जाणार आहे. त्याचा उद्देश १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयातील आकलन वाढवणे हा आहे. मराठी व इंग्रजी भाषांमध्ये हे अध्ययन कार्यक्रम उपलब्ध असणार आहे. खान अकॅडमी ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने (self-paced learning) शिकण्याची संधी देत असून त्यांनी १० हजारांहून अधिक शैक्षणिक व्हिडिओ विकसित केले आहेत. हा करार ३ वर्षांच्या कालावधीसाठी आहे. उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT) करणार आहे.
१५० शाळांमध्ये अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रणाली विकसित होणार;
आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत कार्यरत श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व शालेय शिक्षण विभाग यांच्यातील कराराअंतर्गत सुरुवातीस १५० शाळांमध्ये या कार्यप्रणालीचे कार्यान्वयन करण्यात येणार आहे. शाळांची पूर्वतपासणी व शाळा विकास आराखडा तयार केला जाईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उल्लेख असलेल्या ‘स्कूल कॉम्प्लेक्स’ संकल्पनेनुसार मॉडेल शाळा, पीएम श्री व सीएम श्री शाळांचा यात समावेश असेल. ही संस्था शिक्षण, ग्रामीण व कौशल्य विकासात कार्यरत असून शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे क्षमता विकास आणि समाजाचा सक्रिय सहभाग यावर भर देईल. अशी माहिती यावेळी देण्यात आले.