इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या मुलांच्या वाढदिवसाला पालक वेगवेगळ्या प्रकारचे भेट वस्तू देत असतात, कुणी मोबाईल भेट देतो, तर कुणी लॅपटॉप किंवा बाईक देखील भेट देण्याची प्रथा आहे. परंतु बिहारमधील एका जोडप्याने आपल्या १० वर्षीय मुलीला एक आगळीवेगळी भेट दिली, हे वाचून किंवा ऐकून कुणालाही विश्वास बसणार नाही! परंतु हे सत्य असल्याचे सांगण्यात येते. जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे असे म्हटले जाते की, काही दिवसांनी पृथ्वीवर घरे बांधण्यासाठी जागा राहणार नाही. त्यामुळेच आता मानव चंद्र-मंगळ अन्य ग्रहांवर जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहे. बिहारच्या मधुबनी येथील एका डॉक्टर जोडप्याने आपल्या मुलीला तिच्या १० व्या वाढदिवसानिमित्त आगळीवेगळी भेट दिली. चक्क चंद्रावर एक एकर जमीन खरेदी करून ती आपल्या मुलीला भेट दिली. झांझारपूरमध्ये राहणारे डॉ. सुरबिंदर कुमार झा आणि डॉ. सुधा झा या जोडप्याने पाचवीत शिकणाऱी कन्या आस्था भारद्वाजला जमीन खरेदीची नोंद असलेला कागद भेट म्हणून दिला.
हे दाम्पत्य झांझारपूर नगर पंचायतीमधील एका खासगी नर्सिंग होममध्ये कामाला आहेत. डॉ. सुरबिंदर कुमार झा सांगतात की, आस्था ही त्यांच्या कुटुंबात जन्मलेली पहिली मुलगी आहे. या आनंदात दोघेही त्यांच्या वाढदिवसाला काहीतरी आगळेवेगळे देण्याचा विचार करत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला चंद्रावरील जमिनीच्या रजिस्ट्री पेपरसोबतच चंद्रावर जाण्यासाठीचे विमान तिकीटही उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे तिकीट ही मुलगी तिला पाहिजे तेव्हा वापरू शकते. याबाबत डॉ. सुरबिंदर कुमार झा सांगतात की, चंद्रावर जमीन खरेदी करून कन्येला भेट म्हणून देण्याची प्रक्रिया दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. यासाठी त्यांनी प्रथम विविध वेबसाइटवर त्याची प्रक्रिया शोधली आणि खरेदीची साधने शोधली. ज्यामध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लुना सोसायटीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या सोसायटीच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज केला. ज्याच्या उत्तरात तिथल्या भारतीय दूतावासाचा पासपोर्ट आणि क्लिअरन्स ऑर्डर त्याच्या आणि मुलीच्या नावावर मागवण्यात आली होती.
दरम्यान, त्यांनी मुलीचा पासपोर्ट बनवला आणि त्याच सोसायटीच्या मेलवर पाठवला. त्यानंतर त्याच माध्यमातून त्यांची व त्यांच्या मुलीची पडताळणी करण्यात आली. यानंतर दूतावासाकडून सर्व प्रक्रिया करून घेत सोसायटीनेच क्लिअरन्स कोड मिळवला. यानंतर सोसायटीने चंद्रावर जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया केली आणि त्यांना PayPal अॅपद्वारे जमिनीची रक्कम आणि नोंदणी शुल्क भरले. त्यानंतर स्पीड पोस्टाने नोंदणीचे दस्तऐवज पाठवून मुलीची स्वाक्षरी मेलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले. हे सर्व कागदोपत्री काम केल्यानंतर दि. 27 जानेवारी 2022 रोजी रजिस्ट्री पेपर स्पीड पोस्टने पाठवण्यात आला. तर या मुलीचा वाढदिवस 25 फेब्रुवारी रोजी होता.