विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गामुळे अनेक कुटुंबांवर अतिशय कठीण प्रसंग आले आहेत. कौटुंबिक सदस्यांना अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. त्यातच एक अतिशय हृदयद्रावक बाब समोर आली आहे. देशभरात अनेक रुग्णांना आपल्या कुटुंबापासून व नातेवाईकांपासून दूर किंवा एकाकी रहावे लागते. काही वेळा आईला लहान मुलापासून एकटे राहण्याची वेळ येते, तर काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कुटुंबाला भेटता येत नाही. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये अशीच एक घटना घडली. एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी आपल्या ६ वर्षीय मुलाला कोरोनापासून वाचवण्यासाठी दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, या घटनेचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
गाझियाबादच्या सेक्टर-६ मध्ये राहणारी पूजा वर्मा आणि तिचा पती गगन कौशिक यांना कोरोना संसर्गामुळे खूप काळ वेगवेगळे रहावे लागत आहे. त्यांनी आपल्या ६ वर्षाच्या मुलाला वेगळे ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला. वास्तविक ६ वर्षांच्या लहान मुलाला आई-वडिलांपासून दूर ठेवणे सोपे नव्हते, ते आपल्या पालकांच्या प्रेमासाठी तळमळत होते. वयाच्या सहाव्या वर्षी, कोरोनो विषाणू काय आहे? किंवा कोविडशी संबंधित काय नियम आहेत? पालकांपासून वेगळे राहण्याची का आवश्यकता आहे? हे त्या बाळाला समजू शकले नाही.
एका पत्राद्वारे पूजा यांनी ही हकीकत पंतप्रधानांना कळविली. आपल्या मुलापासून कसे दूर राहावे लागत आहे. हे कवितेच्या माध्यमातून तिने आपले दुःख व्यक्त केले. त्यानंतर पंतप्रधानांनी तिच्या पत्राला उत्तर देताना म्हटले आहे की, “मला आनंद आहे की, या कठीण परिस्थितीतही आपण आणि आपल्या कुटुंबियांनी कोविड- नियमाचे पालन करून या रोगाचा बहादुरीने सामना केला.”
तसेच पंतप्रधान मोदी यांनी ६ वर्षांच्या या मुलाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. धैर्य आणि सकारात्मक विचारसरणी मुळेच हा लढा यशस्वी ठरला. जेव्हा आई आपल्या मुलापासून दूर असते, तेव्हा ती चिंता व्यक्त करते. आपण आणि आपले कुटुंब धैर्याने आणि सकारात्मक विचारसरणीने पुढे जात राहतील. जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा यशस्वीपणे सामना करतील, असा विश्वास देखील मोदींनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.