नाशिक – पाथर्डी रोडवरील विनयनगर येथे मायलेकीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. सुजाता प्रविण तेजाळे (वय ३६) आणि अनया प्रविण तेजाळे (वय ७) अशी त्यांची नावे आहेत. या मायलेकी सुखसागर अपार्टमेंट, प्लॉट नंबर २, बेला पेट्रोल पंपाजवळ, विनयनगर पाथर्डी रोड येथील रहिवासी आहेत. आज या दोन्ही मायलेकींनी घराच्या हॉलमध्ये छताला असलेल्या हुकला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. सुजाता यांचे दीर अशोक मधुकर तेजाळे हे घरी आले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तत्काळ दोन्ही मायलेकींना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. मायलेकीने आत्महत्या का केली हे सुसाईड नोटमुळे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चिठ्ठीमुळे कळले कारण
सुजाता यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली आहे. दोन पानी या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले आहे. सुजाता यांचे पती प्रविण तेजाळे यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. प्रविण यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मायलेकीला त्यांचा विरह सहन होत नव्हता. दोघेही अत्यंत निराशाजनक वातावरणातच वावरत होते. चिमुकली अनयाही पप्पांकडे जाऊ या असा आग्रह धरायची. अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय सुजाता यांनी घेतला. सर्वप्रथम सुजाता यांनी चिमुकल्या अनयाला गळफास दिला. त्यानंतर सुजाता यांनी स्वतः गळफास घेतला. आपल्या चिमुकलीसह सुजाता यांनी स्वतःचे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोंदे मळ्यात एकाची आत्महत्या
नाशिक – वडाळा पाथर्डी मार्गावरील गुरूगोविंद सिंग कॉलेज पाठीमागील दोंदे मळा भागात ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संजय भावराव चौधरी (रा.दोंदे मळा, शरायू नगरी) असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. चौधरी यांनी शुक्रवारी (दि.१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोंखडी अॅगलला नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.