अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातत असलेल्या दगडपारवा येथे अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. सरिता हरवलेल्या आपल्या म्हशीला शोधण्यासाठी सरीता सुरेश घोगरे (वय ४०) ही महिला वणवण भटकत होती. दगडपारवा धरणाच्या लगतच त्यांची शोधाशोध सुरू होती. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट धरणात पडल्या. ही बाब सरिता यांच्या कन्या अंजली (वय १६ वर्षे) आणि वैशाली (१४ वर्षे) यांच्या लक्षात आली. आपल्या आईला वाचविण्यासाठी या दोघीही प्रयत्न करु लागल्या. त्याचवेळी या दोघेही धरणात पडल्या. अखेर पाण्यात बुडून या तिघींचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी या तिघींचेही मृतदेह धरणातील सांडवाच्या पाण्यात सापडले आहेत. तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. घोगरे कुटुंबावर दुःखाचा कोसळला आहे.