इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विशाल भारद्वाज यांच्या ‘ओंकारा’ चित्रपटात नसिरुद्दीन शहा कुठलसं काम आठवल्यामुळे अख्खी ट्रेन यु टर्न घ्यायला सांगतो. एका राजकीय पुढाऱ्याच्या भूमिकेत असलेला नसिर ट्रेन परत फिरवायला सांगतो तेव्हा कमाल वाटते. अशीच कमाल भाजपच्या एका खासदाराने केली आहे. फक्त डास चावला म्हणून त्याने अख्खी ट्रेन पूर्ण साफसफाई होईपर्यंत एका स्टेनशला थांबवून ठेवली.
असे म्हणतात की आमदार-खासदारांमध्ये प्रशासनाला हलवून सोडण्याची शक्ती असते. उत्तर प्रदेशातील एटा मतदारसंघाचे खासदार राजवीर सिंग उर्फ राजू भैय्या गोमती एक्स्प्रेसने दिल्लीला निघाले होते. लखनऊच्या चारबाग रेल्वेस्थानकावरून फर्स्ट क्लास एसीने त्यांचा प्रवास सुरू झाला. चारगाब ते उन्नाव जवळपास एक तासाचं अंतर आहे. यादरम्यान त्यांना एक डास चावला.
खासदार साहेबांना अर्थात राजू भैय्यांना डास चावल्यामुळे त्यांच्यासोबतचे पीए व इतर सहकारी चांगलेच संतापले. आणि स्वीय सहायकाने रेल्वेला ट्वीट केले. त्यांनी साहेबांना ट्रेनमध्ये डास चावल्याची तक्रार आयआरसीटीसीकडे ट्वीटद्वारे केली. आता खासदार साहेबांना डास चावला म्हटल्यावर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. काही क्षणात रेल्वेचे अधिकारी खासदारांच्या डब्यात पोहोचले आणि साफसफाई करण्याचे आदेश दिले. त्यावेळी गाडी उन्नाव स्टेशनला पोहोचली होती.
राजूभैय्यांनी जोपर्यंत संपूर्ण डब्याची साफसफाई होत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली. आणि पुढे बऱ्याच वेळाने गाडी सोडण्यात आली. या घटनेची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लाख तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन खासदारासाठी कसे काय धावून आले, असा सवाल केला जात आहे. त्याचवेळी गाडी थांबविण्याची काय गरज होती, असाही प्रश्न खासदाराला केला जात आहे.
बसणेही कठीण झाले आहे
खासदारांच्या पीएने आयआरसीटीसीला ट्वीट करताना जरासा अतिरेक केला. बाथरूम अस्वच्छ असल्यामुळे साहेबांना डास चावला. त्याचा एवढा त्रास होत आहे की बसणेही कठीण झाले आहे, असे या ट्वीटमध्ये लिहीले. त्यामुळेच प्रशासनात खळबळ उडाली आणि सगळे अधिकारी काही क्षणात त्यांच्या पुढ्यात उभे झाले.
Mosquito Train Stop Gomti Express Uttar Pradesh