मॉस्को (रशिया) – जगभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच आता अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे. विशेषत: आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपमधील ब्रिटन, फ्रान्ससह अन्य देश आणि रशियामध्ये हा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रशियामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यातच मास्कोच्या महापौरांनी शहरात कोणताही महोत्सव नसताना प्रथमच काम न करण्याचा सप्ताह म्हणजेच आठवडाभर सुट्टी जाहीर केली आहे. वास्तविक, मास्को शहरात नेहमी दरवर्षी धार्मिक किंवा सांस्कृतिक महोत्सवासाठी आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात येते.
कोविड साथीची दीड वर्षानंतर संपूर्ण रशियामध्ये रुग्ण प्रकरणे सातत्याने कमी होत होती, तिथे आता आणखी प्रकरणे वाढताना दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यानंतर प्रथमच राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत येथे ६७०१ प्रकरणे नोंदली गेली. ही परिस्थिती लक्षात घेता मॉस्कोचे महापौर सेर्गी सोबेनिन यांनी दि. १५ ते १९ जून दरम्यान काम न करण्याचा सप्ताह जाहीर केला आहे.
आपल्या संदेशात महापौरांनी असे म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत राजधानीत कोरोना संसर्गाची सर्वाधिक नोंद झाली आहे. राजधानीत लसीकरण मोहीम जोरात सुरू असताना असे घडत आहे. राजधानीत वाढत्या संसर्ग लक्षात घेता रुग्णालयांमध्ये हजारो बेडची वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पूर्ण खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.