मुंबई – कारमध्ये कुठलीही अडचण आली तर आपण दुरुस्तीसाठी डीलरकडे चकरा मारतो. पण आता ज्यांच्याकडे कार आहे, त्यांना जास्त चिंता करायची गरज नाही. कारण सरकारने ‘मै हु ना’ म्हणत स्वतःच्याच पोर्टलवर तक्रार करण्याची सोय करून दिली आहे.
तुमच्या कारमध्ये कुठलीही अडचण आली तर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. पण त्यात तुम्हाला पहिले नोंदणी करावी लागेल म्हणजे सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तुमचे वाहन सात वर्षांपेक्षा कमी जुने असेल आणि त्यात कुठल्याही प्रकारची अडचण आली तर सरकार तुमच्या मदतीला धावून येईल.
तक्रार दाखल केल्यानंतर मंत्रालयाच्या मार्फत त्याची चौकशी होईल आणि रिकॉलची व्यवस्था करून देईल. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनासारख्या एजन्सीज अश्या तक्रारींची दखल घेईल. कारची कंपनी दोषी असेल तर तपास करेल, लक्ष ठेवेल आणि त्यात सुधारणेचा आग्रह धरेल. भारतातील सर्व ऑटोमोबाईल कंपन्या आतापर्यंत स्वतःच या गोष्टींचा निर्णय घ्यायच्या. त्यामुळे ग्राहकांना त्यातून मनस्तापच वाट्याला यायचा.
तर कंपनीला दंड
ग्राहकांच्या तक्रारीनंतर सरकारने मध्यस्थी केल्यावर कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले तर १० लाख ते १० कोटी रुपयांपर्यंतचा दंडही कंपनीला ठोठावता येणार आहे. त्यामुळे कारमध्ये दुरुस्तीची वेळ आली तर अव्वाच्या सव्वा पैसे कंपन्यांना ग्राहकांकडून घेता येणार नाही. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांचे अधिकार सुरक्षित राहणार आहेत.