विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही, अशी घोषणा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली आहे. आणि आसामचे शेजारी राज्य असलेल्या मिझोमरमध्ये अनोखी घोषणा करण्यात आली आहे. जास्त मुले असणाऱ्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, या घोषणेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष तिकडे वळले आहे.
एकीकडे भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक वेगाने वाढत असून जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची गणना होत आहे. दुसरीकडे मिझोराममध्ये मात्र लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्यात आली आहे. येथे जास्त मूल असणाऱ्यांना १ लाखाचे बक्षीस राज्य सरकारमधील एका मंत्र्याने जाहीर केले आहे.
मिझोरमचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाव्हिया रॉयटे यांनी घोषणा केली आहे की, आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त मुले असणार्या पालकांना १ लाख रुपयांचे रोख प्रोत्साहन देण्यात येईल. कमी लोकसंख्या असलेल्या मिझो समुदायांना लोकसंख्या वाढविण्यास प्रोत्साहित करणे हा त्यामागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, किमान किती मुले असणाऱ्या कुटुंबांना हा लाभ मिळेल, हे सांगण्यात आलेले नाही. देशातील अनेक राज्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असताना रॉयटे यांनी केलेल्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रॉयटे यांनी म्हटले आहे की, जास्त मुले असलेल्या पालकांना आम्ही ५० हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर देऊ. तसेच अशा व्यक्तीस प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येईल. मिझो समुदायात लोकसंख्यावाढीचा दर अत्यंत कमी आहे आणि तो चिंतेचा विषय आहे. अरुणाचल प्रदेशानंतर मिझोरमची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे. तसेच मिझोरमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही अलिकडेच जाहीर केले आहे की, त्यांचे सरकार हळूहळू जास्त मुलांचे धोरण राबवेल.