पुणे – पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्याने सध्या इलेक्ट्रिक यांची मागणी वाढली आहे. त्यात आज भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहन विभागात आणखी एक नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक डिटेल कंपनीने भारतीय बाजारपेठे अत्यंत किफायतशीर इलेक्ट्रिक मोपेड लाँच केली आहे. विशेष म्हणजे या नवीन वाहनासाठी लायसनची गरज नाही.
आकर्षक आणि मजबूत इलेक्ट्रिक मोटर असलेल्या या मोपेडची किंमत फक्त 39,999 रुपये आहे. मात्र त्यात जीएसटीचा समावेश नाही. तसेच इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे फक्त 1,999 रुपयांमध्ये या इलेक्ट्रिक मोपेडचे बुकिंग करू शकतात. सदर वाहन देशभरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच वाहन बुक केल्यानंतर, उर्वरित रक्कम पुढील केवळ 7 दिवसात जमा करावी लागेल. यासंबंधीची अतिरिक्त माहिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरही देण्यात आली आहे.
या इलेक्ट्रिक मोपेडमध्ये 170 एमएमचे सर्वोत्तम ग्राउंड क्लिअरन्स असून यामध्ये 48V आणि 20Ah क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. तसेच ही बॅटरी सीटखाली बसवली आहे. सदर वाहन एका चार्जमध्ये 60 किमी पर्यंत ड्रायव्हिंग अॅव्हरेज रेंज देते. ही इलेक्ट्रिक मोपेड 170 किलो पर्यंत भार वाहू शकते. याशिवाय दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
या मोपेडचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी सारख्या कागदपत्रांची गरज नाही. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी संपूर्ण देशभरात आपले नेटवर्क विस्तारण्यात गुंतले आहे. सध्या कंपनीचे दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात अनेक विक्री पॉइंट आहेत. तसेच ही मोपेड सिल्व्हर ग्रे आणि मेटॅलिक रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.