नवी दिल्ली – टपाल कार्यालय (पोस्ट ऑफिस) मधील आवर्ती ठेव (आरडी) एक चांगले गुंतवणकीचे साधन असून यात काही लोक नियमितपणे निश्चित रक्कम जमा करतात आणि त्यातून व्याज (उत्पन्न ) मिळवू शकतात. नोकरदार वर्ग आणि मध्यम उत्पन्न गटासाठी दरमहा गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित व चांगला पर्याय म्हणून ओळखला जातो.
इंडिया पोस्टच्या वेबसाइटवरील माहिती नुसार, सध्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस आरडीवर वार्षिक ५.८ टक्के दराने व्याज दिले जात आहे. आरडीकडून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे. विशेष गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसची आरडी ही सरकार मान्य एक योजना आहे. पोस्ट ऑफिस आरडी पाच वर्षांच्या मुदतीसह येते. या योजनेंतर्गत, दरमहा किमान १०० रुपये किंवा १० च्या गुणाकारात कोणतीही रक्कम असलेले खाते उघडता येईल. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नाही.
पोस्ट ऑफिस आरडी ही वैयक्तिक किंवा एकल पालक, संयुक्त खाते (कमाल ३ प्रौढांपर्यंत), एक अल्पवयीन १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पाल्याच्या वतीने पालक, आणि मानसिक रूग्ण व्यक्तीच्या वतीने एक व्यक्ती उघडू शकतो. या योजनेत खाते रोख किंवा धनादेशाद्वारे उघडता येते.
या योजनेंतर्गत महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत खाते उघडले असेल तर आपल्याला महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पैसे जमा करावे लागतील. त्याचबरोबर जर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसानंतर खाते उघडले गेले तर महिन्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पैसे जमा करावे लागतील.
पोस्ट ऑफिस आरडी योजने अंतर्गत कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. ही कर्ज सुविधा १२ हप्ते जमा केल्यानंतर उपलब्ध आहे. खात्यात जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम घेतली जाऊ शकते. कर्जाची भरपाई एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये केली जाऊ शकते.
कर्जावरील व्याज दर हा आरडीवरील २ टक्के अधिक व्याज दर असेल. व्याजाची रक्कम पैसे काढण्याच्या तारखेपासून परतफेडच्या तारखेपर्यंत मोजली जाईल. मॅच्युरिटीपर्यंत कर्जाची परतफेड केली गेली नसेल तर आरडी खात्याच्या मॅच्युरिटी व्हॅल्यूमधून कर्ज अधिक व्याज वजा करण्यात येईल.
कोणत्याही नजिकच्या किंवा संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह कर्जाचा अर्ज भरल्यास कर्ज घेता येते. खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनंतर आरडी खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद केले जाऊ शकते. मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद झाल्यास टपाल कार्यालय बचत खात्यात व्याज दिले जाते. म्हणून दरमहा गुंतवणुकीसाठी हा एक
सर्वोत्तम पर्याय मानला जातो.