इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंबहुना ते सुरू असतानाच अनेक जण नोकरीच्या शोधात असतात. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, बेरोजगारी अधिक आहे आणि नोकऱ्यांची संधी कमी. असे असले तरी महिन्याकाठी ८ लाखांचा पगार आणि आठवड्याला दोन सुट्ट्या असे मिळत असूनही कुणीही नोकरीला तयार होत नसल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. पण हे खरे आहे. अर्थात ही परिस्थिती भारतातील नाही.
महात्मा गांधी नेहमी सांगत की, जोपर्यंत श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही, तोपर्यंत या देशाचे प्रगती होणार नाही. त्यामुळेच त्यांनी साफसफाई किंवा स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याला सन्मानाने वागविण्याची शिकवण दिली. कोणतीही काम करण्याची लाज बाळगणे योग्य नसते. कारण कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. मात्र अद्यापही आपल्या देशात शिपाई असो की सफाई करणारा कर्मचारी यांना सन्मानाने वागविणे दूरच त्यांना पगारही अत्यंत कमी मिळतो. मात्र एका देशामध्ये मात्र या कामासाठी महिन्याला आठ लाख रुपये मिळतात असे सांगितले, तर कुणालाही खरे वाटणार नाही. मात्र हे सत्य आहे.
भारतात सफाई कामगार यांचे काम कमी दर्जाचे समजले जाते. तरीही या नोकरीसाठी सर्व वर्गांतून लाखो अर्ज येत असतात. नोकरीच्या जागांपेक्षा त्यासाठी आलेले अर्ज कितीतरी प्रमाणात अधिक असतात. डी ग्रुप अंतर्गत येणाऱ्या सफाई कामगारांचे वेतन 18 हजार रुपयांच्या आसपास असते. पण जर याच कामासाठी ऑस्ट्रेलियात 8 लाख रुपये मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियात सध्या सफाई कर्मचारी आणि प्यून यांची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कंपन्यांद्वारे नवनवीन ऑफर्स जाहीर करण्यात येत आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला जास्त वेळ काम( ओव्हर टाईम) करावे लागले , तर त्यांना प्रति तासासाठी 3600 रुपये अधिक मिळतील, अशी माहिती ॲबसोल्युट डोमेस्टिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी ही रक्कम प्रति तासासाठी 2700 रुपये इतकी होती. मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. पण एवढ्या ऑफर्सनंतरही या कामासाठी कामगार मिळत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांना एवढ्या मोठ्या पॅकेजची ऑफर देण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही हे काम करण्यासाठी कोणीही तयार नाही. या पॅकेजमध्ये इतका पगार, आठवड्याला दोन सुट्ट्या आणि इतर सुविधांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ 5 दिवसच काम करावे लागेल. तसेच त्यांच्या दिवसभरात 8 तासच काम करावे लागणार आहे. काही ठिकाणी या कामासाठी 72 लाख ते 1 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजही ऑफर करण्यात आले आहे. अर्बन या ऑस्ट्रेलियन कंपनीत सफाई कामगारांचे वेतन दुपटीने वाढवण्यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना प्रति तासासाठी 4700 रुपये देण्यासही कंपनी तयार आहे. त्या हिशोबाने सफाई कर्मचाऱ्याचे वार्षिक पॅकेज 97 लाख रुपयांच्या आसपास होईल.
Monthly 8 Lakh Salary Weekly 2 Holidays But Nobody Ready For Service
Australia Sweeper Peon Job Opportunity Recruitment