मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जनता ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहते, त्या पावसाने यंदा आपल्या देशाची चांगलीच दाणादाण उडवली आहे. जून पासून सुरू झालेला पाऊस चक्क दिवाळीचे आगमन होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या भागात बरसतच आहे. चार महिने मुक्कामला असलेल्या पावसाने यंदा अनेक ठिकाणी महापुरामुळे थैमान घातले. तसेच शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली. मोठ्या प्रमाणावर जीवीत हानी झाली, परंतु आता दिवाळीला उद्यावर आल्याने या पावसाने विश्रांती घेतली असून त्याने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे आणि परतीच्या मार्गावर लागला आहे. त्यामुळे आता केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील नागरिकांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. या पावसाने लाखो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे आतापर्यंत १२३ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. सर्वत्र खूप बरसलेल्या पावसाने आज रविवारी निरोप घेतला आहे. ही सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच देशातून देखील मान्सून परतला आहे.
बंगालच्या उपसागरालगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळं मान्सून पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकणार आहे. उद्या दि. २३ ऑक्टोबर रोजी डीप डिप्रेशनमध्ये परावर्तित होणार आहे. त्याचे २४ ऑक्टोबरपर्यंत सीतरंग चक्रीवादळात रुपांतर होत आहे. सीतरंग चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टी, पश्चिम बंगाल- बांगलादेश किनारपट्टीजवळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. मात्र नैऋत्य मोसमी पावसाने आज महाराष्ट्रातून माघार घेतली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
आता मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही.
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातली पिके सडून गेली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बसला आहे. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. राज्यात मान्सून माघारी फिरला असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. आता हवामान कोरडे राहणार असल्याने शेती कामाला वेग येणार आहे.
शेतकरी बांधवांना आता रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. पाऊस माघारी फिरला असल्याने आता राज्यात थंडीचा जोर वाढणार असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. तसेच सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. संपूर्ण राज्यात दि.२८ ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिमाण होणार नाही. याशिवाय चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातच राहणार असून ते भारतीय किनारपट्ट्यात धडकणार नाही गेल्या ५० वर्षात बंगालच्या उपसागरात जास्त वादळे निर्माण होत होती, पण गेल्या ५ वर्षांपासून अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण वाढलं आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणाम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे राज्यासह किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे यंदा परतीचा पाऊस लांबण्याची विविध कारणे आहेत. समुद्राचे वाढलेले तापमान, कमी दाबाचा पट्टा, तसेच अल् निना या कारणाने परतीचा पाऊस हाहाकार करत असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. शहरी भागात बांधकामे प्रचंड झाली आहेत. त्यामुळे तापमान सुद्धा जास्त असते, त्याठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सारखे प्रकार करतात असे म्हटले जाते.
Monsoon Update Maharashtra IMD Forecast