मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंदमानमध्ये १६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. तर, केरळमध्ये २७ मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राल मान्सून कधी बरसेल आणि यंदाचा पावसाळा कसा असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण, मान्सूनलाच भारताचे अर्थमंत्री म्हटले जाते. मान्सूनवरच भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
मुंबईत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर हे सुद्धा हजर होते. यावेळी त्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती दिली आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून महाराष्ट्रात कसा असेल ते स्पष्ट झाले आहे.
डॉ. होसाळीकर म्हणाले की, महाराष्ट्रात ५ जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यात यंदा सामान्यपेक्षा जास्त (above normal) पाऊस होईल तसेच एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस राहणार आहे. ला नीना परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पावसाबाबत चिंता करण्याचे तूर्त तरी कारण नाही, असे स्पष्ट झाले आहे.