नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी संस्थगित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सोमवार, २१ जुलै रोजी सुरू झाले होते. या अधिवेशनात ३२ दिवसांच्या कालावधीत २१ बैठका झाल्या. या अधिवेशनादरम्यान, लोकसभेत १४ विधेयके सादर करण्यात आली. लोकसभेत १२ विधेयके आणि राज्यसभेत १५ विधेयके मंजूर झाली. संसदेच्या दोन्ही सभागृहात एकूण १५ विधेयके मंजूर झाली. तसेच, लोकसभेत एक विधेयक मागे घेण्यात आले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या ठोस , यशस्वी आणि निर्णायक कारवाईवर २८ आणि २९ जुलै रोजी लोकसभेत तर २९ आणि ३० जुलै रोजी राज्यसभेत विशेष चर्चा झाली. लोकसभेत ही चर्चा १८ तास ४१ मिनिटे चालली. या चर्चेत ७३ सदस्यांनी भाग घेतला आणि पंतप्रधानांनी त्याला उत्तर दिले. राज्यसभेत एकूण १६ तास २५ मिनिटे चाललेल्या चर्चेत ६५ सदस्यांनी भाग घेतला आणि गृहमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले.
१८ ऑगस्ट रोजी लोकसभेत भारतीय अंतराळवीराच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील प्रथम प्रवास आणि ‘विकसित भारत- २०४७’ साठी अंतराळ कार्यक्रमाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही विशेष चर्चा सुरू करण्यात आली होती, मात्र सभागृहात सतत गोंधळ सुरू राहिल्याने चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.
लोकसभेत सादर केलेल्या विधेयकांची यादी, निवड समितीकडे पाठवलेली विधेयके, संयुक्त समितीकडे पाठवलेली विधेयके, लोकसभा आणि राज्यसभेने तसेच दोन्ही सभागृहांची मंजूर केलेली विधेयके परिशिष्टात जोडली आहेत.
दोन्ही सभागृहांमध्ये संपूर्ण अधिवेशनात सतत व्यत्यय आला आणि त्यामुळे लोकसभेचे कामकाज अंदाजे ३१ टक्के आणि राज्यसभेचे कामकाज अंदाजे ३९ टक्के झाले.