‘आजपासून विभागानुसार कमी-अधिक तीव्रतेने, महाराष्ट्रात पावसाला सुरवात ‘
आज शुक्रवार, २३ जून ला बं.उ. सागर मान्सून शाखा पुढे झेपावत झारखंड, बिहार काबीज करत विदर्भात प्रवेश केला आहे. आज शुक्रवार, २३ जूनपासुन संपूर्ण महाराष्ट्रात विभागानुसार कमी-अधिक तीव्रतेने, पावसाला सुरवात होवु शकते.
कोकण विभाग-
-मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित केरळ, कर्नाटक राज्यातील संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत आज शुक्रवार दि.२३ जूनपासुन पुढील आठवडाभर जोरदार ते अति- जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भ विभाग –
विदर्भातील सर्व १० जिल्ह्यात आज व उद्या दि. २३,२४(शुक्रवार, शनिवार) ला मध्यम तर परवा रविवार दि२५ पासुन जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभाग –
वर अंदाजित कोकणातील अति-जोरदार पावसामुळे सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्रातील १० तर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात आज केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ तर उद्या शनिवार दि.२४ जून पासुन मध्यम तर परवा रविवार दि २५ पासुन जोरदार पावसाची शक्यता ह्या क्षेत्रात जाणवते.
थोडक्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अंतर्गत भागातील वर्षांच्छायेच्या टापूत (नाशिक नगर पुणे सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तर जळगांव छ.सं.नगर बीड धाराशिव सोलापूर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात) मात्र आज व उद्या दोन दिवस पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी परवा रविवार दि.२५ पासुन तेथेही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते
मान्सून अजुनही त्याच्या वाटचालीतच म्हणजे पूर्व-मोसमी पावसाच्या वातावरणातुन मोसमी पावसाच्या वातावरणात प्रवेशणाऱ्या संक्रमनीय काळात आहे. त्यामुळे प्रवेश केलेल्या भागाच्या आगमनात एक-दोन दिवस विजांचा कडकडाट व गडगडाटही वातावरणाचा अनुभव येतो. त्यामुळे गोंधळून न जाता पाऊस मोसमी कि पूर्वमोसमी ह्याची शहानिशा न करता पाऊस होत आहे हे महत्वाचे समजावे. पाऊस झाला तर लगेच पेरणी करू नये, असे वाटते.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर अपेक्षित चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी ६ जुलै नंतर पेरणीचा निर्णय योग्य ठरु शकतो, असे वाटते.
देशात उष्णतेची लाट लोप पावली आहे.महाराष्ट्रात विदर्भातही उष्णता-सदृश स्थितीही विरळली आहे.
तरी सध्या दिवसाचे कमाल तापमान जरी ३ ते ४ डिग्रीने खालावले असले तरी ते विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात सध्याच्या काळातील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिकच असुन तेथे एकंदरीत ते ३८ ते ४० डिग्री दरम्यान असल्याचे जाणवते.
उत्तराखंडातील बद्री- केदार तसेच हिमाचल प्रदेशातील पर्यटकांना आजपासुन पुढील आठवडाभर गडगडाट, वीजा, गारासहित जोरदार ते अतिजोरदार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता जाणवते. एकंदरीत हिमालयीन पर्यटनासाठी वातावरणीय दृष्ट्या सध्याचा ह्या आठवड्यातील काळ कदाचित गैरसोयीचा ठरु शकतो, असे वाटते.
पंढरीवारी वारकऱ्यांना परवा रविवार दि. २५ जून पासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यमुळे त्या पुढील ४-५ दिवस मात्र काहीसे गैरसोयीचे जाणवतील, असे वाटते.
‘बिपोरजॉय’ च. वादळाचा जोर पूर्णपणे विरला आहे.
सध्या इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५