‘ मान्सून ने देश व्यापला’
रेंगाळलेल्या मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला आहे. जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला तरी अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा आहे. पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतूरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिन्याचा पावसाचा नेमका अंदाज काय आहे हे आपण आता जाणून घेऊ…
‘ जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस ‘ ‘ मंगळवार ४ जुलैपासून उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पाऊस बरसेल.
दक्षिणेकडे सरकलेला मान्सून ट्रफ व अरबी समुद्रातील ‘ ऑफशोर ट्रफमुळे परवा मंगळवार पासून कोकणा बरोबरच उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते मुसळदार पावसाची शक्यता जाणवते.
सरासरी जुलै ८ ला देश काबीज करणारा मान्सून ६ दिवस अगोदरच आज २ जुलै ला देशात पोहोचला.
जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असुन ६ जुलै पासून पूर्ण ओल असेल तेथे पेरणी करण्यास हरकत नाही, असे वाटते.
एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणाल्यांचे अस्तित्व असुनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे, असे वाटते. तरी देखील अधिक तीव्रतेने नसला तरी काहीसा मान्सून सध्या बरसतच आहे.
चला, अजुनही ५-६ दिवस आपल्या हातात आहे. पुढील ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यताही जाणवत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात ६ जुलैपर्यन्त किती पाऊस होतो ते बघून जमिनीत किती ओल येते ह्याचा अंदाज घेऊन मात्र ६ जुलै नंतर जेथे पुरेशी ओल साध्य झाली असेल तर तेथे योग्य वाफस्यावर तीन ते साडे तीन महिने वयाची खरीप पिकांची पेरणी करण्यास हरकत नसावी, असे वाटते.
अर्थात तो निर्णय शेतकऱ्यांनी स्वतः विवेकाच्या कसोटीवर व कृषी विभागाच्या सल्ल्यानेच घ्यावा, असेही येथे नमूद करावेसे वाटते.
जुलै ६ नंतर मात्र कदाचित महाराष्ट्रात आठ-दहा दिवस किरकोळ ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.
तेंव्हा पावसाच्या, अश्या उघड-झाप खेळीत, जशी उघडीपीची सापड मिळेल तशी, योग्य ओल व योग्य वापस्यावर पेरणी उरकावी, असे आज एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून, आव्हान करावेसे वाटते.
जेथे पर्जन्यमान कमी असेल तेथे मात्र धूळपेरणी टाळावीच, ह्या घोषणेत मात्र अजुनही फरक करू इच्छित नाही. कृपया शेतकऱ्यांनी ह्याचीही मनी नोंद घ्यावी, असे वाटते.
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५