‘पावसाचा जोर काहीसा ओसरणार’
जुलै १६ च्या भाकितात सांगितलेला १० ते १२ दिवस जोरदार पावसाच्या कालावधी आज शुक्रवारी संपत आहे. मान्सूनने गेल्या ३-४ दिवसात सह्याद्रीचा घाट उतरून महाराष्ट्राच्या मैदानी भागात समाधानकारक हजेरी लावत केवळ जालना, सातारा, सांगली असे ३ जिल्हे वगळता आजपावेतो जुलै महिन्याची तुट भरून काढत आतापर्यन्त पडलेल्या पावसाची टोटल सरासरीच्या पुढे झेपावत आहे. असे असले तरी, पावसाचे वितरण मात्र सम प्रमाणात न झाल्यामुळे खरीप हंगामाची स्थिती राज्यात विशेष समाधानकारक भावत नाही.
उद्या शनिवार दि.२९ जुलै पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि.५ ऑगस्ट पर्यन्त मुंबईसह संपूर्ण कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा वगळता विदर्भ, मसराठवाडा, खान्देश सह उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. तेथे केवळ मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते. तेथे शेत मशागत व पेरीसाठी कदाचित अधून-मधून उघडीपही मिळू शकते.मात्र मुंबईसह संपूर्ण कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता अजुन कायम जाणवते.
महाराष्ट्रातील मैदानी भागात भलेही मान्सूनने कमी तीव्रतेने हजेरी लावली असली तरी घाटमाथ्यावरील धरणक्षेत्रात त्याची कामगिरी उत्तम झाली. जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात केवळ २५% पर्यन्त असलेला धरण जलसाठा, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्याअखेरीस किंवा १ ऑगस्टपर्यन्त कदाचित भाकीत केल्याप्रमाणे ७०% पर्यन्त पोहोचू शकतो, असे वाटते. त्यानंतरही अजुन मान्सूनचे २ महिने शिल्लक आहेत.
ह्या पावसाने (i)खरीपातील शेवटच्या टप्प्यातील उर्वरित पेरण्यास तसेच (ii) कमी ओलीवरील झालेल्या पेर पिकांना जीवदान व (iii) बारगळलेल्या पेरण्यांच्या दुबार पेरणीस मदत होवु शकते. उशिरातील पेरणीमुळे भलेही कदाचित धान्यरास झड कमी येऊ शकते पण तरीही खरीप हंगाम साजरा होवु शकतो. हेही महत्वाचे समजावे, असे वाटते. अंदाजाप्रमाणे जुलै महिन्यात पाऊस झाला असुन ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती ३-४ दिवसात कळवली जाईल.
आज इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५