‘वास्तव २०२३ च्या मान्सूनचे’
मान्सून मध्ये जोर नाही. घाट माथ्यापर्यंतच संथपणे साधारणच पाऊस बरसत आहे. परंतु पालघर, ठाणे, सबर्बन मुंबई, मुंबई शहर, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्याच्या तळ कोकणात मात्र सध्या मान्सून गेल्या पंधरवाड्यापासून चांगलाच कोसळत आहे.
मान्सूनच्या सध्याच्या ताकदीनुसार साधारण एक ते दिड किमी. उंच असा सह्याद्री वर चढून आल्यावर सह्याद्रीच्या साधारण २०० किमी. रुंदीच्या घाट माथ्यावरील पूर्व- पश्चिम पट्ट्यातच म्हणजे महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा मावळ मुळशी वेल्हे भोर पोलादपूर महाबळेश्वर बावडा राधानगरी इ. परिसरातच पाऊस पाडून मान्सूनची ताकद सध्या तेथेच संपून जात असल्याचे जाणवते. त्याचा फायदा मात्र सह्याद्री घाटमाथा धरण क्षेत्र जलसंवर्धन करणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात जोरदार पावसामुळे नद्या वाहु लागल्या आहेत. त्यामुळे धरण जलक्षमतेची टक्केवारी नोंदण्यास सुरवात झाली आहे.
मान्सूनची ताकद सह्याद्री घाटमाथ्यावरच का संपून जात आहे?
सह्याद्रीच्या ह्या २०० किमी. रुंद घाटमाथ्यावरच मान्सूनच्या रेंगाळण्यामुळे पुढे सह्याद्रीचा दक्षिणोत्तर घाट उतरायला व तेथून पुढे पूर्वेकडे सरकण्यास मान्सूनला लागणारी अधिकची आवश्यक असणारी ताकद(आर्द्रतारुपी ऊर्जा व मागून नैरूक्त मान्सून वाऱ्यांचा रेटा) कमी पडत असल्यामुळे मान्सून स्वतः सह्याद्रीचा एक ते दिड किमी. उंचीचा घाट खाली उतरण्यास तयार नाही. मग ह्या मोसमी पावसाला घाटमाथ्यावरून वर स्पष्टीत केलेल्या मध्य महाराष्ट्रातील वर्षाच्छायेच्या जिल्ह्यात उतरण्यासाठी अरबी समुद्राहून त्याच्या बरोबर आलेल्या व आवश्यक लागणाऱ्या आर्द्रतेच्या ऊर्जेच्या ताकदीबरोबरच त्याला कवेत उतरून घेण्यासाठी बं. उपसागरावरून आलेली एखादी मजबूत कमी दाब क्षेत्र प्रणाली पुढे खेचण्यासाठी येण्याचीही आवश्यकता असते. म्हणजेच सध्याच्या त्याच्या सरासरी कालावधीत नेहमी असते तशी नैसर्गिकपणे बं. उ. सागरात तयार होवून मध्य भारतात(छत्तीसगड व सीमावर्ती मध्यप्रदेश भागात )येणे आवश्यक आहे. आणि नेमकी तीच मजबूत प्रणाली बं. उ. सागराहून सध्या आलेली नाही. आणि त्याचं उत्तरही कदाचित ‘ एल -निनो ‘ तच असावं, असे वाटते.
मग ती प्रणाली मजबूत तयार होवून पुढे आली नाही का? किंवा सध्या त्या ठिकाणी काय प्रणाली आहे?
तर त्या ठिकाणी सध्या बं. उपसागरातून हवेचा कमी दाब क्षेत्राची आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे छ. गड, विदर्भ, म. प्रदेशकडे कूच करणारी प्रणाली आहे, परंतु ती कमकुवत आहे. सह्याद्रीतील घाटमाथ्यावरच पडत असलेला मान्सून, मध्य महाराष्ट्राच्या वर्षच्छायेच्या प्रदेशातील काहींश्या मैदानी भागात घाट उतरून घेण्यासाठी, व मान्सून ला वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद फारच अपुरी पडत आहे. म्हणून तर सध्या केवळ घाटमाथ्यावरच किरकोळच स्वरूपाचा पाऊस पडत आहे. व उर्वरित मध्य महाराष्ट्राच्या १० व मराठवाड्याच्या ३ जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण आहे पण खुपच कमी आहे. त्या प्रणालीचा कमकुवतपणा ‘ एल – निनो ‘ त आहे. हाच तो ‘ एल – निनो ‘ चा परिणाम समजावा, असे वाटते.
बरं, ह्याच दरम्यान कदाचित ‘आयओडी ‘ जरी मजबूत असता तरी मान्सून कोसळण्याच्या अतिउच्चं काळात कदाचित एल – निनो ला न जुमानता नक्कीच धुंव्वाधार पाऊस कदाचित आपण अनुभवला असता असे वाटते. पण तेही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या खान्देश, नाशिकपासून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पर्यंतच्या तसेच मराठवाड्याच्या छ. सं. नगर, बीड धाराशिव जिल्ह्यांच्या पश्चिमकडील संपूर्ण वर्षाच्छायेच्या भागात सध्या अगदीच किरकोळ पाऊस पडत आहे तर काही भागात अगदीच नगण्य पाऊस पडत आहे. पेरणी योग्य पावसाची येथे कमतरताच सध्या येथे आपल्याला जाणवत आहे.
एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणाल्यांचे अस्तित्व असुनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे, असे वाटते. तरी देखील अधिक तीव्रतेने नसला तरी काहीसा मान्सून सध्या बरसतच आहे. चला, अजुनही ५-६ दिवस आपल्या हातात आहे. पुढील ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यताही जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ६ जुलैपर्यन्त किती पाऊस होतो ते बघून जमिनीत किती ओल येते ह्याचा अंदाज घेऊन मात्र ६ जुलै नंतर जेथे पुरेशी ओल साध्य झाली असेल तर तेथे योग्य वाफस्यावर तीन ते साडे तीन महिने वयाची खरीप पिकांची पेरणी करण्यास हरकत नसावी, असे वाटते.
अर्थात तो निर्णय शेतकऱ्यांनी स्वतः विवेकाच्या कसोटीवर व कृषी विभागाच्या सल्ल्यानेच घ्यावा, असेही येथे नमूद करावेसे वाटते.
जुलै ६ नंतर मात्र कदाचित महाराष्ट्रात आठ-दहा दिवस किरकोळ ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.
तेंव्हा पावसाच्या, अश्या उघड-झाप खेळीत, जशी उघडीपीची सापड मिळेल तशी, योग्य ओल व योग्य वापस्यावर पेरणी उरकावी, असे आज एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून, आव्हान करावेसे वाटते.
जेथे पर्जन्यमान कमी असेल तेथे मात्र धूळपेरणी टाळावीच, ह्या घोषणेत मात्र अजुनही फरक करू इच्छित नाही. कृपया शेतकऱ्यांनी ह्याचीही मनी नोंद घ्यावी, असे वाटते.
इतकेच!
माणिकराव खुळे,
जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ
भारतीय हवामान खाते,
पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५