नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील नऊ राज्ये मान्सूनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पावसावर सारे काही अवलंबून आहे. शेतीपासून संसदेपर्यंत प्रत्येकाचे टेंशन वाढविण्याची क्षमता पावसावर आहे. कारण मान्सून लांबणीवर जाण्याची दाट शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे मान्सून आला असे वाटत असतानाच केवळ एका राज्याला स्पर्श करून मान्सून निघून जाईल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोदी सरकारने प्लॅन बी तयार केला आहे.
हवमान खात्याने मॉन्सूनच्या आगमनाबाबत वेळोवेळी अपडेट्स दिले आहेत. अगदी आज सुद्धा मुंबईतील ढगाळ वातावरणाने आशा पल्लवीत केल्या आहेत. मात्र यंदा पाऊस सर्वसामान्य असेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. पण या सर्वसामान्य पावसामुळे अनेकांचे टेंशन वाढणार आहे, असे दिसत आहे. कारण एकतर मॉन्सून लांबणीवर जाणार आणि त्यानंतरही पाऊस सर्वसामान्यच पडणार, हे शेतकऱ्यांसाठी आणि केंद्र सरकारसाठी सुद्धा त्रासदायक ठरणार आहे.
केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, तामीळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही नऊ राज्ये व चार केंद्र शासीत प्रदेशांमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी फक्त केरळला स्पर्श करून मॉन्सून निघून जाणार असल्याचेही हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास थेट शेतीवर परिणाम होईल. पीक व्यवस्थित झाले नाही तर अन्नसाठ्यावर परिणाम होईल. परिणामी ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल आणि पुन्हा एकदा गरिबी वाढायला लागेल, अशी भिती केंद्रातील एका मंत्र्याने व्यक्त केली आहे. सरकारच्या विविध योजनांवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. सरकारच्या ८० कोटी लोकांना मोफत अन्न देण्याच्या योजनेलाही फटका बसेल. खाद्य पदार्थांच्या किंमती वाढतील. एकूणच महागाई वाढेल, अशीही भिती व्यक्त होत आहे.
या विभागांना सूचना
केंद्र सरकारच्या कृषी, खाद्य, ग्रामीण विकास, वित्त आणि जलशक्ती या पाच मंत्रालयांची एक कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना या संकटापासून वाचण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकार टेन्शनमध्ये
यंदा लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. पुढील वर्षी यावेळपर्यंत सरकार स्थापन झालेले असेल. त्यामुळे या वर्षात बेरोजगारी, महागाई वाढणे, शेतकऱ्यांचे नुकसान होणे सरकारला परवडणारे नाही. कोरोनाच्या संकटातून सावरल्यानंतर नवे संकट सरकारपुढे उभे ठाकले आहे.
Monsoon Modi Government Plan B