मान्सून केरळात दाखल आणि पुढील काही दिवसांचे हवामान
एक जून ह्या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून ४ दिवस उशिराने म्हणजे ४ जूनला अपेक्षित होता. त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक जमेस धरून तो केरळात १ जून ते ८ जून ह्या ८ दिवसादरम्यान कधीही दाखल होवु शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याकडून ह्यावर्षी आगमनासंबंधी वर्तवले गेले होते. त्याप्रमाणे मान्सून आज गुरुवार दि. ८ जुनला भाकीतप्रमाणे केरळात दाखल झाला आहे.
दाखल झालेला नैरूक्त मान्सून आगमनाच्या त्याच्या खालील अटी पुर्ण करून जवळपास केरळचा संपूर्ण भाग व तामिळनाडूचा ३०% भाग कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर, व तामिळनाडूतील कोडाईकनल व आदिरामपट्टीनाम शहरातून जाते.
मान्सून दाखल होण्याच्या घोषणेसाठी हव्या असलेल्या अटीपैकी खालील ४ अटी पुर्ण केलेल्या आहेत.
i) जबरदस्त अ. समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात जमिनीपासून ६ किमी जाडीपर्यन्त वाहणारे समुद्री वारे
ii)केरळाकडे जमीन समांतर ताशी ३० ते ३५ किमी वाहणारे समुद्री वारे
iii) आग्नेय अ. समुद्रात व केरळ कि. पट्टी समोरील अलोट ढगाची दाटी
iv) संध्याकाळी अ. समुद्रातून पाणी पृष्ठभागवरून अवकाशात प्रति चौ. मिटर क्षेत्रफळावरून १९० व्याट्स म्हणजे २०० व्याट्स पेक्षा कमी वेगाने उत्सर्जित होऊन बाहेर फेकणारी दिर्घलहरी उष्णताऊर्जा
पुढील २ दिवसात कर्नाटकात मान्सून प्रवेश करण्याची शक्यता जाणवत आहे. सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. तो ह्यावर्षी ८ जूनला केरळात दाखल झाल्यामुळे १८ जूनला मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा करू या! त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन मुंबईत १४ ते २२ जूनच्या दरम्यान केंव्हाही होवु शकते असे वाटते.. मुंबईत मान्सून सेट झाल्यावर सह्याद्री ओलांडून नंतर तो उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो.
शुक्रवार दि.९ जून पासुन त्यापुढील ३ दिवस म्हणजे सोमवार दि.१२ जून पर्यन्त मुंबईसह कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
‘बिपॉरजॉय ‘ चक्रीवादळ आज सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात त्याचे ठिकाण असुन महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटते.
अति उष्णता म्हणजे अति आर्द्रता हे हवामान शास्त्रीय सूत्र आहे. सूर्यकिरणांच्या जमिनीवर ओतल्या जाणाऱ्या सध्याच्या उष्णते मुळे दुपारचे कमाल तापमानात झालेली कमालीची वाढ, शिवाय त्या किरणांना अडथळा करणाऱ्या ढगांचा अभाव ह्यामुळे अधिक उष्णता म्हणून अति आर्द्रतेत कमालीची झालेली वाढ ह्यातून सध्या असह्य अशी जीवाची घालमेल जाणवतआहे. सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भ व कोकणात नकळत उष्णतेच्या लाटेसारखी जवळपास स्थिती आहे आणि हेच मुख्य कारण असुन १५ जून पर्यन्त अशीच स्थिती असु शकते. असे वाटते.
त्यानंतर कदाचित वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो. कारण १६ जूनच्या आसपास मान्सून कदाचित गोव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतो. त्याच दरम्यान जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे भागात बिपोरजॉय ‘ वादळातील अति-अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी २५ ते ३० किमी. वेगाचे वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम ह्या भागात जाणवेल, असे वाटते.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Monsoon Maharashtra Weather Climate Forecast