जागेवरच खिळलेला,
प्रगती नसलेला,
मान्सून कमकुवतच
गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच मान्सूनसाठी हे चक्रीवादळ अतिशय अडथळ्याचे ठरले. त्यानंतरही मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर आला आहे. पण, यापुढची वाटचालही त्याची सोपी नसल्याचे दिसून येत आहे. जाणून घेऊया यंदाच्या मान्सूनविषयी…
अति तीव्र ‘ बिपोरजॉय ‘ चक्रीवादळ ‘ गुरुवार दि.१५ जूनला संध्याकाळी गुजराथमधील ‘ जखाऊ ‘ बंदराजवळील मांडवी शहरादरम्यान ताशी १२५ किमी. त्याच्या परिघ-चक्रकार तर झटक्याखालील ताशी १५० किमी. पर्यंतच्या अश्या वारा वेगाने आदळण्याची शक्यता ही कायम आहे.
चक्रीवादळाच्या सध्याच्या होत असलेल्या मार्गक्रमणामुळे आजपासून पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. १६ जूनपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा व संपूर्ण खान्देश भागात ढगाळ वातावरणासहित ताशी ३५ ते ४० किमी. पर्यंतच्या झटक्याखालील वेगवान वाऱ्यासहित किरकोळ ते मध्यम पावसाची शक्यता ह्या संपूर्ण भागात जाणवते.
नैरूक्त मान्सूनच्या मार्गक्रमणासाठी वातावरण अनुकूल आहे असे जरी आपण ऐकत असलो तरी नैरूक्त मान्सून पुढे मार्गस्थ होण्यासाठी त्याचा कमकुवतपणा झाकून राहिलेला नाही. कारण महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरच गेल्या ४ दिवसापासून त्यात प्रगती नसून सध्या आहे त्याच ठिकाणी तो खिळलेला आहे.
कदाचित रविवार दि.१८ ते बुधवार दि. २१ जून दरम्यानच मान्सून पुढे सरसावण्याची हालचाल होईल, असे वाटते. ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाचाही मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही. विदर्भात मात्र आजपासून पुढील ५ दिवस म्हणजे सोमवार १९ जूनपर्यंत उष्णतेची लाटसदृश स्थिती जाणवेल.
‘एल-निनो’ च्या पूर्वी भाकितानुसार मान्सून काळात १५ जुलैनंतर विकसनाची शक्यता होती परंतु तो सध्या आताच विकसित झाल्याचा खुलासा ‘ नोआ’ ह्या परदेशी संस्थेकडून होत आहे. म्हणजेच १५ जुलै पर्यन्तच्या २५-३० दिवसात अपेक्षित कोसळू शकणाऱ्या मान्सून पावसाच्या सरींचीही आशा सुद्धा आता मावळते कि काय असे वाटू लागले. जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पावसाच्या भाकीत खरे ठरले असुन अर्धा महिना संपला तेंव्हा महाराष्ट्रातील पावसाची महिन्याची तुट ५०% पेक्षा अधिक आहे.
सध्या केवळ धन अवस्थेकडे झुकू लागलेली ‘ हिंद महासागरीय द्विध्रुवीता ‘ (इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी) हाच एक वातावरणीय घटक एल -निनो च्या वर्षात पावसासाठी पूरक ठरु पाहत आहे व त्यानेच आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. हेच खरे मान्सूनसंबंधी सध्याचे वास्तव आहे. बघू या काय घडते ते!
गेल्या फेब्रुवारीपासुन सावध करत आहोत , कि ह्यावर्षी एल -निनो आहे. परंतु मागील ३ वर्षाच्या ला निनामुळे झालेल्या भरपूर पावसामुळे सध्या जमिनीत असलेल्या भरपूर पाणीसाठ्याच्या भरवश्यामुळे शेतकरी ऐकायला तयार नाहीत. कितीही फोडून सांगा, तरी विचारत आहे, कि पेरणीयोग्य पाऊस कधी होईल? चुळबुळ करतच आहे. २० जून च्या आसपास सुरु होणाऱ्या मोसमी पावसातून, जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात (२३-३० जून) सर्व चित्र स्पष्ट करणाऱ्या पेरणी योग्य अशा पावसाची अपेक्षा करू या! तरी ८ इंच साधलेल्या पूर्णओली वरची पेरणीच कदाचित ह्यावर्षी हंगाम जिंकून देईल, असे वाटते. ‘वाट बघा, लक्ष ठेवा’. पण ह्यावर्षी धूळ पेरणी मात्र टाळाच!
आसामकडील पुर्वोत्तरच्या ७ राज्यात मात्र आजपासून पुढील संपूर्ण आठवड्यात पावसाच्या अतिवृष्टीची शक्यता जाणवते.
तर बद्री-केदारच्या हिमालयीन पर्यटकास पुढील संपूर्ण आठवड्यात म्हणजे बुधवार दि.२१ जूनपर्यंत दुपारनंतरच्या गडगडाटी वातावरणासहित मध्यम पावसास तोंड द्यावे लागेल, असे वाटते.
इतकेच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Monsoon Maharashtra Rainfall State Climate Forecast