मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच आता भारतात प्रवेश करणार आहे. यंदा पर्जन्यमान लवकर बरसणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. आता मान्सूनच्या भारतातील प्रवासाबाबत विभागाने तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार हे स्पष्ट झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून येत्या २७ मे रोजी भारतीय भूभागावर म्हणजेच केरळमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर मान्सूनला पोषक स्थिती मिळाल्यास तो वरच्या भागात (उत्तरेकडे) सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रात तसेच मुंबई ६ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. हा प्रवेश त्याच दिवशी झाल्यास (म्हणजे मागे-पुढे न झाल्यास) उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि अन्य भागात मान्सून ११ जूनच्या सुमारास जोरदार बरसेल. गेल्या वर्षी महाराष्ट्रात येण्यास मान्सूनला जुलै उजाडला होता. यंदा मात्र, एक महिन्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पावसाची ही स्थिती लक्षात घेता शेतीच्या कामांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे.