‘मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची सलामी ‘
सरासरी १० जून ला मुंबईत हजेरी लावणारा मान्सून, १५ दिवसाच्या उशिराने आज रविवार २५ जून ला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र काबीज करून वेगाने पुढे झेपावत जम्मू काश्मीर, लेह लडाख पर्यन्त मजल मारली आहे. मान्सूनची आजची अधिकतम सीमारेषा वेरावळ बडोदा उदयपूर अंबाला कटरा ह्या शहरातून जाते. ६२ वर्षानंतर आज एकाच दिवशी मान्सून ने देशाची आर्थिक राजधानी मुंबई व राजधानी दिल्लीत हजेरी लावली.
बळकट व ताकदवान अश्या पश्चिमी मान्सूनी समुद्री वारे, कोकण ओलाचिंब करीत सह्याद्री ओलांडून पुढे वाटचाल केल्यामुळे आज रविवार दि.२५ जूनपासुन पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार २९ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.
विशेषतः सह्याद्री घाटमाथा धरण क्षेत्र जलसंवर्धन करणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यातही जोरदार पावसामुळे प्राथमिक अवस्थेत का होईना नद्या वाहतवनी होवून सुरवातीची काहीशी जलसंजीवनी त्यांना प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा करू या!
शुष्क वातावरणातून पावसाळी वातावरणातील बदल शेतकऱ्यांची मानसिकताही बदलवतो. ‘ पाऊस सुरु झाला’, ‘आता तो असाच पडेल’. ‘नंतरही पडेल ‘, अश्या कल्पनांच्या गृहीतकावर घाने पेर उरकवली जाते.
पण इतके दिवस पावसाने थांबवलेच होते तर अजुन एक आठवडा वाट बघून, ६ जुलै नंतर पूर्ण ओलीवरच पेरणी करावी. असे वाटते. ‘आयओडी’ ने पावसासाठी काय मदत करायची ती करू दे, पण ‘एल-निनोचे वर्ष आहे, हंगाम पूर्णहोईपर्यन्त त्याचा विसर पडूच नये, असेच वाटते.
पावसाचा जोर कशामुळे? मान्सूनच्या सध्याच्या अनुकूल अवस्था व वातावरणीय प्रणाल्या कोणत्या?
(i)अरबी समुद्रात कर्नाटक ते महाराष्ट्र अर्ध पश्चिम कि. पट्टीलगत तटीय हवेच्या कमी दाबाच्या द्रोणीय ‘आसा’ मुळे तसेच (ii)महाराष्ट्र पश्चिम कि.पट्टीवर आदळणाऱ्या पश्चिमी मान्सूनी समुद्री वाऱ्यामुळे (iii)गुजरात-महाराष्ट्र लगतच्या अ. समुद्र उत्तर कि. पट्टीवर बेचक्यात साडेतीन ते सहा किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्यामुळे (iv)बंगाल-ओरीसा पूर्व कि.लगत बं. उ. सागरात हवेचे मान्सूनी कमी दाब क्षेत्र निर्मितीमुळे साडेसात किमी. उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्यामुळे (v)बं.उ. सागरातील कमी दाब क्षेत्र ते पंजाब पर्यन्त एक किमी. उंचीपर्यंत पसरलेला पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ मुळे मान्सून दोन्ही शाखासहित एकत्रित पुढे झेपावेल, असे वाटते.
ह्यातील क्रं.(iv)मधील प्रणाली पुढील काही दिवस महाराष्ट्राला पावसासाठी अधिक अनुकूल ठरणार आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1672886381407002625?s=20
आज इतकेच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते,
पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५