मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण भारतवासिय ज्या क्षणाची डोळ्यात तेल घालून दरवर्षी प्रतिक्षा करतात त्या मान्सून अर्थात नैऋत्यू मोसमी वाऱ्यांचे आगमन आज अंदमान आणि निकोबार बेटांवर झाले आहे. तशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. पुढील आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर तो हळूहळू उत्तरेकडे सरकत संपूर्ण भारतात वर्षाव करणार आहे.
मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मान्सूनने अंदमानमध्ये धडाक्यात प्रारंभ केला आहे. त्यामुळेच केरळमध्ये साधारण १ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २७ मे रोजीच दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात नैऋत्यकडे जाणारे पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान आणि निकोबार बेटे, अग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते पाच दिवसात केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.
मे महिन्यातील तप्त तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. परंतु यंदा वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. १५ मे रोजी अंदमानात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. हा अंदाज आता खरा ठरला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1526099789363826688?s=20&t=GAi0jKhZWDtoyFMrU78Asg