नाशिक (जिमाका वृत्तसेवा) – धरणक्षेत्रासह परिसरात पडणाऱ्या पावसाची माहिती दर तासाला आपत्ती नियंत्रण कक्षासह जिल्हा प्रशासनास कळवावी, पावसाचा जोर जास्त असल्यास ही माहिती दर 15 मिनीटांनी सादर करावी. तसेच धरणांच्या ठिकाणी आपत्कालीन संदेश यंत्रणा उभारण्यासह नदीच्या पुराची पातळी मोजतांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, मान्सून काळात धरणातून पाण्याचा विसर्ग करतांना संबंधित कार्यालयात तात्काळ माहिती देण्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्याची नियुक्ती करून संनियंत्रण अधिकारी तथा नोडल अधिकारी यांना कामासंबंधीत जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी. तसेच धरण क्षेत्रातील नियंत्रण कक्षात मान्सून संपेपर्यंत तीन शिफ्टमध्ये अधिनस्त कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करावी. घटनास्थळी शोध व बचाव कार्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन करण्यात यावे. तसेच ब्रिटीशकालीन नादुरूस्त पुलांचा सर्व्हे करून आवश्यकता भारल्यास संबंधित पुल या काळात बंद करून त्याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी सूचना फलक लावण्यात यावेत.
धोक्याच्या पातळीबाबत योग्य ती वेळ निश्चित करून नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना पूर परिस्थिती निर्माण होण्याआगोदरच सतर्कतेचा इशारा देणारी विशेष कार्यप्रणाली तयार करावी. या कार्यप्रणाली अंतर्गत संदेश देण्यासाठी सोशल माध्यमांचा व इतर यंत्रणेचा वापर करून धरणातून पाणी विसर्ग होत असल्यास पुररेषेत येणाऱ्या सर्व गावांना तात्काळ सूचित करण्यात यावे. तसेच धरणातून विसर्ग करतांना सर्व विभागांशी समन्वय साधून विसर्ग करण्यात यावा.
अतिवृष्टी मुळे दरड कोसळणे, रस्ते खचणे, पूल व इमारत कोसळणे, रस्त्यावरील झाडे कोसळणे इत्यादी घटना घडतात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. अशा वेळी ढिगारे व रस्त्यावरील पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री जे.सी.बी., पोकलेन, क्रेन, ट्रॅक्टर, गॅस कटर, वुड सॉ कटर इत्यादी साधने पुरेशा इंधनासह उपलब्ध होईल या दृष्टीकोणातून नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.