मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशवासिय ज्याच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत तो मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सकाळी त्याची घोषणा केली आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असल्याने त्याला भारताचा अर्थमंत्रीही म्हटले जाते. तो केरळमध्ये पोहचल्याने आता तो हळूहळू संपूर्ण भारत व्यापणार आहे.
हवामन विभागाने सांगितले की, मान्सून 1 जूनच्यासामान्य सुरुवातीच्या तारखेपासून फक्त तीन दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने यापूर्वी १४ मे रोजी दिलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये 27 मे रोजी (4 दिवस पुढे किंवा मागे) मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले होते. अखेर आज २९ मे ला मान्सून आला आहे. गुरुवारी मान्सून सुरू झाल्याची घोषणा करण्यासाठी बहुतेक पॅरामीटर्स अपूर्ण राहिले, परंतु शुक्रवारी त्यात थोडी सुधारणा झाली. हवामानशास्त्राच्या ताज्या संकेतांनुसार, दक्षिण अरबी समुद्राच्या खालच्या पातळीतील पश्चिमेकडील वारे तीव्र आणि खोल झाले आहेत.
हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले होते की, “उपग्रह प्रतिमांनुसार, केरळचा किनारा आणि लगतचा आग्नेय अरबी समुद्र ढगाळ आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. याच कालावधीत अरबी समुद्र आणि लक्षद्वीप प्रदेशातील आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी पुढील परिस्थिती देखील अनुकूल आहे. आणि आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
महाराष्ट्रात कधी येणार
केरळमध्ये सध्या पोषक वातावरण असल्याने मान्सून पुढच्या आठवड्यातच महाराष्ट्रामध्ये दस्तक देण्याची चिन्हे आहेत. ४ ते ५ जूनच्या दरम्यान मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाव करणार आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1530795741312000000?s=20&t=fgsDHHlfefLczVOIbkj60Q