इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही आजार हा जीवघेणा ठरतो, आजच्या काळात जगभरात अनेक नवनवीन प्रकारचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे ठरते. आणखी विशेष बाब म्हणजे जगभरातील अनेक देशांमध्ये समलिंगी संबंध व उभयलिंगी संबंध याला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे त्यांनी एका नवीनच आजारा संदर्भात काळजी घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण हा आजार प्रामुख्याने या व्यक्तींना होऊ शकतो, असे म्हटले जाते.
युनायटेड किंगडम (यूके) च्या आरोग्य संरक्षण एजन्सीने समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांना इशारा दिला आहे की, शरीरात असामान्य पुरळ किंवा फोड आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. ब्रिटनने 6 मे पासून आपल्या नवव्या मंकीपॉक्स प्रकरणाची नोंद केल्यानंतर हा इशारा दिला आहे. याबाबत इंग्लडच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, विषाणू लोकांमध्ये सहजपणे पसरत नाही, परंतु अलीकडील प्रकरणे समलिंगी, उभयलिंगी आणि एमएसएम समुदायांमध्ये आढळून आली आहेत. “आम्ही या गटांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत,” असे एजन्सीने म्हटले आहे.
यूकेएचएसएचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. सुसान हॉपकिन्स म्हणाले की, एजन्सी समुदाय संक्रमणाच्या भीतीने या संसर्गाच्या स्त्रोताचा तातडीने तपास करत आहे, ते म्हणाले की ते ‘दुर्मिळ आणि असामान्य’ आहे. संस्था संक्रमित रूग्णांच्या संभाव्य जवळच्या संपर्कांशी संपर्क साधत आहे. आम्ही विशेषतः समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांना कोणत्याही असामान्य पुरळ किंवा फोडांबद्दल जागरूक राहण्यासाठी आणि विलंब न करता लैंगिक आरोग्य सेवेशी संपर्क साधण्याचे आवाहन करत आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लैंगिक संपर्कातून पसरणाऱ्या संसर्गावर चिंता व्यक्त केली होती. आम्ही पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार्या पुरुषांमध्ये संक्रमण पाहत आहोत असे डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन प्रतिसादासाठी सहायक महासंचालक म्हणाले. मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे जो उंदीर आणि प्राइमेट सारख्या वन्य प्राण्यांमध्ये उद्भवतो आणि नंतर लोकांमध्ये पसरतो. बहुतेक प्रारंभिक संक्रमण मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत नोंदवले गेले. दोन मुख्य प्रकार आहेत – काँगो स्ट्रेन, जो अधिक गंभीर आहे आणि मृत्यू दर 10 टक्क्यांपर्यंत आहे आणि पश्चिम आफ्रिकन स्ट्रेन, ज्याचा मृत्यू दर सुमारे 1 टक्के आहे.
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, बहुतेक रुग्णांना ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवतो. तथापि, गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आणि हातांवर पुरळ आणि फोड येऊ शकतात आणि ते शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात. युनाइटेड किंगडम व्यतिरिक्त, इटली आणि स्वीडनमध्ये देखील प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अमेरिकेने या वर्षातील पहिले प्रकरण नोंदवले.