इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चालू कॅलेंडर वर्षात अन्नधान्याच्या किमती बहुतांश प्रमाणात स्थिर आणि नियंत्रणात राहिल्या आहेत. आजपर्यंत, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे देखरेख ठेवण्यात आलेल्या बहुतांश वस्तूंच्या किमती वर्ष -दर-वर्ष स्थिर किंवा घसरणीचा कल दर्शवत आहेत.
देशभरातील विविध केंद्रांवर टोमॅटोच्या किरकोळ किमती कोणत्याही मूलभूत मागणी-पुरवठा तफावत किंवा उत्पादनातील तूट यामुळे नव्हे तर तात्पुरत्या स्थानिक घटकांमुळे प्रभावित होतात.
या संदर्भात, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ ) 4 ऑगस्ट 2025 पासून आझादपूर मंडीतून टोमॅटोची खरेदी करत आहे आणि ग्राहकांना रास्त दरात विकत आहे. मागील वर्षांमध्येही एनसीसीएफने असाच उपक्रम हाती घेतला होता.
आजपर्यंत, एनसीसीएफने खरेदी खर्चाच्या आधारे 47 ते 60 रुपये प्रति किलो या किरकोळ किमतीत 27,307 किलो टोमॅटो विकले आहेत. एनसीसीएफच्या नेहरू प्लेस, उद्योग भवन, पटेल चौक आणि राजीव चौक येथील स्टेशनरी आउटलेटद्वारे तसेच शहरातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या 6–7 फिरत्या व्हॅनद्वारे किरकोळ विक्री केली जात आहे.
दिल्लीमध्ये टोमॅटोचा सध्याचा सरासरी किरकोळ भाव 73 रुपये प्रति किलो आहे, जो प्रामुख्याने जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आहे. हवामानाशी संबंधित या व्यत्ययामुळे जुलैच्या अखेरीस किमती 85 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या. मात्र गेल्या आठवड्यात आझादपूर मंडईत दररोजची आवक सुधारत असल्यामुळे आणि स्थिर असल्यामुळे मंडई आणि किरकोळ किमती दोन्हीमध्ये घट होऊ लागली आहे.
याउलट, चेन्नई आणि मुंबईसारखी प्रमुख शहरे, जिथे गेल्या काही आठवड्यांमध्ये अनैसर्गिक हवामानाचा अनुभव आलेला नाही, तेथील किमतीत अशी वाढ झालेली नाही. चेन्नई आणि मुंबईमध्ये टोमॅटोचे सध्याचे सरासरी किरकोळ दर अनुक्रमे 50 रुपये प्रति किलो आणि 58 रुपये प्रति किलो आहेत – जे दिल्लीतील सध्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहेत. सध्या, टोमॅटोचे संपूर्ण भारतातील सरासरी किरकोळ दर 52 रुपये प्रति किलो आहेत जे गेल्या वर्षीच्या 54 रुपये प्रति किलो आणि 2023 मधील 136 रुपये प्रति किलोपेक्षा अजूनही कमी आहेत.
तसेच बटाटा, कांदा आणि टोमॅटो यासारख्या प्रमुख भाज्यांच्या किमती यंदाच्या पावसाळी हंगामात मागील वर्षांच्या तुलनेत नियंत्रणात आहेत. बटाटा आणि कांद्याच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत 2024-25 मध्ये झालेल्या अधिक उत्पादनामुळे पुरेसा पुरवठा आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ किंमतीत लक्षणीय घट दिसून आली आहे. यावर्षी, सरकारने किंमत स्थिरीकरण बफरसाठी 3 लाख टन कांदा खरेदी केला आहे. बफरमधून टप्प्याटप्प्याने आणि ठराविक प्रमाणात कांद्याचा साठा सप्टेंबर 2025 पासून बाजारात आणला जाईल अशी अपेक्षा आहे.