नाशिक – आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे आज कोरोनामुळे दु:खद निधन झाले. आज उपचार सुरु असतांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काही काळातच मोनाली यांची देखील प्राणज्योत मालवली. ही अतिशय दु:खद बातमी आहे. मोनाली गोऱ्हे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक, श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते.
क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी – पालकमंत्री छगन भुजबळ
क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रशिक्षक मोनाली व त्यांच्या वडिलांच्या निधनाने गोऱ्हे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय गोऱ्हे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर मृतांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना करतो अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रध्दांजली अर्पण केली.