नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरासमोरील अंगणात झोपलेल्या १६ वर्षीय युवतीच्या विनयभंग केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना लाखलगाव (ता. जि.नाशिक) येथे २०१७ मध्ये घडली होती. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी. डी.देशमुख यांच्या कोर्टात चालला.
देण्यात आलेल्या माहितीनुसार, नासिर अनिस शेख (२५ रा.ब्राम्हणगल्ली,लाखलगाव ता.जि.नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ वर्षीय पिडीता १८ मे रोजी रात्री उकाड्यामुळे आपल्या कुटूंबियासह घरासमोरील अंगणात झोपलेली असतांना ही घटना घडली होती. संशयीताने मध्यरात्री तिच्या अथरूणात घुसून हे कृत्य केले होते. मुलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंग,पोक्सो आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी वकिल अॅड.दिपशिखा भिडे यांनी पाच साक्षीदार तपासले असता न्यायालयाने नासिर शेख यास तीन वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.