नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे प्रतिलिटर ८ आणि ६ रुपयांची कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली. या कपातीनंतर पेट्रोल ९.५ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ७ रुपये प्रतिलिटर स्वस्त झाले आहे. यानंतर आता मोदी सरकारने आणखी एक मास्टर स्ट्रोकची तयारी केली आहे. इंधनांनंतर आता आणखी काही वस्तूंच्या किंमती घटविण्याची तयारी केली आहे. येत्या काही दिवसातच त्याची घोषणा होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलशिवाय केंद्र सरकारने सिमेंट, स्टिल आणि लोह या संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोह, स्टिल आणि त्यांच्या कच्च्या मालावरील सीमा शुल्कामध्ये केंद्र सरकार बदल करणार आहे, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
सीतारमण म्हणाल्या, की आम्ही लोह आणि स्टिलच्या कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यासाठी आयातीवरील सीमाशुल्कात कपात करणार आहोत. स्टिलच्या काही कच्च्या मालाच्या आयातीवरील शुल्काची कपात करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक उत्पादनांसाठी कच्चा माल आणि दलालांवरील सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्पादनांच्या आयातीवर भारत अधिक अवलंबून आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या, की सिमेंटच्या किमती कमी करण्यासाठी चांगल्या दळणवळणाच्या साधनांची मदत घेतली जाणार आहे. सिमेंटची उपलब्धता उत्तम ठेवण्यासाठी निकषांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रयत्नांमुळे सिमेंटच्या किमती निश्चित कमी होण्यास मदत होईल.