नवी दिल्ली – कोरोना विषाणूने जगात मोठ्या प्रमाणात उलथापालथ घडवून आणली आहे. अनेकांच्या आप्तस्वकीय, कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी जीव गमावला आहे. अनेकांचे रोजगार, उद्योगधंदेसुद्धा बुडाले आहेत. अशा नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना काळात नोकरी गमावलेल्या राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ईसीएसआय) सदस्य असलेल्या कर्मचार्यांसाठी केंद्राने आनंदाची बातमी दिली आहे. नोकरी गमावलेल्या अशा कर्मचार्यांना केंद्र सरकारकडून तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे.
एनएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली आहे. भूपेंद्र यादवे म्हणाले, की कोरोना काळात जीव गमावलेल्या ईसीएसआय सदस्यांच्या कुटुंबीयांना श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून आयुष्यभर आर्थिक मदत केली जाणार आहे. परंतु त्यांनी अद्याप याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.
भूपेंद्र यादव म्हणाले, की प्रत्येक राज्यात लेबर कोड तयार करण्याचे काम सुरू आहे. नवा लेबर कोड कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ई-श्रम पोर्टलवर ३८ कोटी मजूर, स्थलांतरित मजूर, फेरीवाले आणि घरेलू कामगारांसारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोर्टलवर नोंदणीकृत कामगाराला एक ई-श्रम कार्ड दिले जाईल. या कार्डमध्ये १२ आकड्यांचा युनिक नंबर असेल. हा नंबर कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी उपयोगात येईल.
श्रमाशी संबंधित २९ कायदे ४ कोडमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. हे लागू झाल्यानंतर कंपन्यांच्या कामकाजाशी संबंधित नियमांमध्ये व्यापक बदल होणार आहेत. एक ऑक्टोबरला हे कोड लागू केले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु आता थोडी वाट पाहावी लागणार आहे.