मुंबई – जगभरातील अनेक देशांमध्ये कल्याणकारी शासन व्यवस्था आदर्श मानली जाते. जनतेच्या कल्याणासाठी तेथील प्रस्थापित सरकार हे विकासात्मक काम करीत नागरिकांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असते. भारतात देखील लोकशाही राज्यव्यवस्थेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार कल्याणकारी धोरण राबवित असते. सहाजिकच जनतेच्या कल्याणासाठी सरकारच्या मालकीच्या अनेक स्वायत्त संस्था कार्यरत आहेत. परंतु वाढत्या तोट्यामुळे या शासकीय संस्था किंवा शासकीय कंपन्यांमार्फत कार्यभार चालविणे दिवसेंदिवस कठीण बनले आहे.
सहाजिकच सरकारी तिजोरीतील कोट्यवधींचा तोटा भरून काढण्यासाठी निर्गुंतवणुकीचे धोरण अवलंबिले जात आहे. त्यामुळेच अनेक सरकारी कंपन्यांची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियानंतर आता सरकारची नजर महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल ) आणि भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल ) वर आली आहे. दोन्ही दूरसंचार कंपन्यांच्या स्थावर मालमत्ता सरकारी वेबसाइटवर सुमारे 970 कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी घोषित केल्या आहेत.
डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) च्या वेबसाइटवरून ही माहिती प्राप्त झाली आहे. बीएसएनएलच्या मालमत्ता हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे आहेत आणि विक्रीसाठी त्यांची आरक्षित किंमत 660 कोटी रुपये आहे. तसेच गोरेगाव, मुंबई येथे असलेल्या एमटीएनएल मालमत्ता DIPAM वेबसाइटवर सुमारे 310 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीत विक्रीसाठी जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे, ओशिवरा (मुंबई) येथे स्थित MTNLचे 20 फ्लॅट्स देखील कंपनीच्या निर्गुंतवणुक योजनेचा भाग म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची राखीव किंमत सुमारे 52 लाख ते दिड कोटी रुपये आहे. MTNL मालमत्तेचा ई-लिलाव 14 डिसेंबर रोजी होणार आहे.
बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी सांगितले की, एमटीएनएल आणि बीएसएनएल या मालमत्तेचा पहिला टप्पा आहे. BSNL च्या 660 कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी आणि MTNL च्या 310 कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी बोली मागवण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम दळणवळण कंपनी आहे. सुमारे 34 टक्के बाजार भांडवल असलेली ही भारतातील सर्वात मोठी संप्रेषण कंपनी आहे. तिचे मुख्यालय भारत संचार भवन, हरीश चंद्र माथूर लेन, जनपथ, नवी दिल्ली येथे आहे बीएसएनएल ही मोबाईल सेवा प्रदाता कंपन्यांमध्ये पहिली कंपनी होती ज्याने इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत केले. दूरसंचार क्षेत्रात भारत सरकारवरील लोकांचा विश्वास वाढवला.BSNL ही भारतातील सर्वात जुनी कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर (CSP) कंपनी आहे.
सरकारने भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशन, एअर इंडिया, आयटीडीसी आणि हॉटेल कॉर्पोरेशन यांसारख्या मोठ्या कंपन्यामधील आपला सहभाग आधीच काढून घेतल्या आहेत आणि त्या खाजगी हातात दिल्या आहेत. दहा वर्षांपूर्वीपर्यंत बीएसएनएल आणि एमटीएनएल कोणत्याही खासगी कंपनीशी स्पर्धा करत होत्या, पण आपले काम व्यवसाय करणे नाही, असा सरकारचा दावा असला तरी, सरकार आपल्या उद्योगपती मित्रांना नफेखोर कंपन्या विकून देशाचे मोठे नुकसान करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार करत आहेत.