नवी दिल्ली – आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील सर्व केंद्रीय निमलष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत आणि कॅशलेस उपचार उपलब्ध होतील. तसेच आयुष्मान भारत अंतर्गत मान्यताप्राप्त कोणत्याही सीजीएचएस हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचारांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
गृहमंत्री अमित शहा यांनी एनएसजी जवानाला आयुष्मान कार्ड देऊन या योजनेची सुरुवात केली. केंद्रीय निमलष्करी दलाच्या सर्व ३५ लाख जवानांना दि. ३१ डिसेंबरपर्यंत आयुष्मान कार्ड देण्याचे गृह मंत्रालयाने लक्ष्य ठेवले आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सात केंद्रीय निमलष्करी दले आहेत. यामध्ये NSG, आसाम रायफल्स, ITBP, SSB, CISF, BSF आणि CRPF यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयुष्मान सीएपीएफ योजना सुरू करताना अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारने नेहमीच सुरक्षा दलांच्या हिताची काळजी घेतली असून तो त्या साखळीचा एक भाग आहे. या योजनेंतर्गत केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व सेवारत कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना कव्हर केले जाईल. गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी संयुक्तपणे ही योजना तयार केली आहे.
आयुष्मान CAPF योजनेच्या लाभार्थ्यांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून गृह मंत्रालयाने टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १४५८८ जारी केला आहे. यासोबतच ऑनलाइन तक्रारीची प्रणाली तयार करण्यात आली असून, त्यामुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे त्वरित निराकरण करता येईल. अमित शहा यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात आसाममधून या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. यानंतर डिसेंबरपर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत साडेसात लाख कार्डे देण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र नंतर त्यात वाढ करून सर्व ३५ लाख जवानांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.