विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान वेगवेगळ्या मंत्र्यांना गटाने बोलावून त्यांच्या कामाचा आढावा घेत आहेत. या बैठकीदरम्यान गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा सुद्धा उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी गुरुवारपासून मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत तीन मंत्र्यांच्या समुहांच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी रामेश्वर तेली, व्ही. के. सिंह यांच्यासह इतर मंत्र्यांच्या कामाची माहिती घेतली. या बैठका पाच तासांहून अधिक काळ सुरू होत्या. अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाच्या कामाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही केले. पंतप्रधानांनी कृषी, ग्रामीण विकास, पशुपालन आणि मत्स्यपालन, आदिवासी विभाग, शहरी विकास, संस्कृती, सांख्यिकी, नागरी उड्डयन, रेल्वे, ग्राहक, पेट्रोलियम, पोलाद आणि पर्यावरण मंत्रालयांच्या मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. मंत्र्यांच्या कामाचा आढावा पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
आज यांचा क्रमांक
पंतप्रधानांच्या निवासस्थानी शनिवारी (१२ जून) मुख्तार अब्बास नकवी, धर्मेंद्र प्रधान, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, गजेंद्र सिंह शेखावत यांना त्यांच्या कामांसह पाचारण करण्यात आले आहे.
अपना दल, निषाद पार्टीसोबत चर्चा
गृहमंत्री अमित शाह यांनी अपना दलाच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल आणि निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद यांच्यासोबत चर्चा केली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दृष्टीनं या बैठकीकडे पाहिले जात आहे. संयुक्त जनता दलासोबतही प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पक्षांसोबत पुढील आठवड्यात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा
मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकालात मंत्रिमंडळ विस्तार खूप दिवसांपासून प्रलंबित होता. गेल्या मार्चमध्येसुद्धा विस्तारावर मंथन झाले होते. यादरम्यान कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला.