नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाचे नाव निघाले की त्यांच्यासोबत मोदी सरकारचा उल्लेख झालाच पाहिजे. गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले खास सख्य कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे अदानींचे मार्केटमधील शेअर्स घसरत असताना विरोधक शांत बसणे शक्यच नाही. मोदी सरकारने मात्र आमचा अदानी प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले आहे.
अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना इतर उद्योजकांच्या तुलनेत जास्त फेव्हर केलं जातं, असा आरोप विरोधक सातत्याने मोदी सरकारवर करत असतात. अदानींच्या कंपन्यांना विशेष प्राधान्य देण्यात येत असल्याची टिकाही सातत्याने मोदी सरकारला ऐकावी लागत असते. अश्यात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण करण्यासाठी जबाबदार ठरविण्यात आलेल्या गौतम अदानींचा प्रश्न संसदेत विचारला जाणार नाही तर नवलच. संसदेत काँग्रेस, राष्ट्रवादी, टीएमसी, शिवसेना, समाजवादी पार्टी या पक्षांनी गदारोळ घातला. अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा व्हायला हवी, अशी मागणी विरोधक करीत आहेत. यातच विरोधकांनी अदानी उद्योग समूहामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी करण्यात आली. त्यावर या प्रकरणाशी मोदी सरकारचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
विरोधकांकडे दुसरा मुद्दाच नाही
विरोधकांकडे दुसरा मुद्दा नसल्यामुळे ते अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी करीत आहेत, असे प्रत्युत्तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले. त्याचवेळी या प्रकरणाशी सरकारचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असेही ते म्हणाले. शुक्रवारी संसदेचे कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू झाल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.
संपत्ती निम्म्यावर
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ज्या घडामोडी झाल्या त्यामुळे आता जवळपास एक आठवड्यात गौतम अदानींची संपत्ती निम्म्यावर आली आहे. त्याचा वाईट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, अशीही भिती व्यक्त होत आहे.
श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
अदानींच्या मागचे विघ्न संपत नसतानाच आता श्रीमंतांच्या यादीतूनही ते बाहेर पडले आहेत. जगातील तीसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आता थेट २१ व्या स्थानावर जाऊन पडले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता ६१.३ अब्ज डॉलर एवढी आहे. ६९.८ अब्ज डॉलर संपत्तीसह मार्क झुकेरबर्क १२ व्या क्रमांकावर आहे.
Modi Government on Adani Stock Big Fall