नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डाळींचे दर अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने केंद्रातील मोदी सरकारने आता सर्वसामान्यांना स्वस्तात चणाडाळ देण्याचे जाहीर केले आहे. ‘भारत डाळ’ या ब्रँड अंतर्गत एक किलोच्या पॅकसाठी 60 रुपये किलो दराने तर 30 किलोच्या पॅकसाठी 55 रुपये प्रती किलो दराने अनुदानित दरातील चणा डाळ विक्री होणार आहे. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते पकरण्यात आला आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज अनुदानित दरातील चणाडाळ विक्रीचा प्रारंभ केला. ‘भारत डाळ’ या ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या एक किलो डाळीच्या पॅकसाठी 60 रुपये किलो तर 30 किलो डाळीच्या पॅकसाठी 55 रुपये प्रती किलो असा दर निश्चित करण्यात आला आहे.
नाफेड म्हणजेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या दिल्ली-एनसीआर परिसरातील किरकोळ विक्री केंद्रांमध्ये चणा डाळीची विक्री होत आहे. ‘भारत डाळ’ या ब्रँडची सुरुवात म्हणजे सरकारकडे असलेल्या साठ्यातील चण्याचे चणाडाळीत रुपांतर करून ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले प्रमुख पाऊल आहे.
नाफेडच्या दिल्ली-एनसीआर परिसरातील किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून तसेच एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफल केंद्रांच्या माध्यमातून चणाडाळ वितरणासाठी नाफेडने डाळ दळणे आणि ती पॅक करणे याची जबाबदारी स्वीकारली आहे. या व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारांना देखील त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलीस कर्मचारी, तुरुंगातील जेवण व्यवस्था यांना होणाऱ्या पुरवठ्यासाठी आणि राज्यांच्या ग्राहक सहकारी दुकानांमध्ये विक्रीसाठी देखील ‘भारत डाळ’ या ब्रँडच्या डाळीचे वितरण केले जाते.
चणा हा कडधान्याचा प्रकार भारतात मुबलक प्रमाणात पिकवला जातो तसेच संपूर्ण भारतात विविध रूपांमध्ये याचे सेवन करण्यात येते. चणे भिजवून, उकडून त्याची कोशिंबीर करतात तसेच ते भाजून चटपटीत खाणे म्हणूनही खाल्ले जातात. आमट्या आणि सूपामध्ये तूरडाळीला पर्याय म्हणून तळलेली चणाडाळ वापरली जाते. चण्याचे पीठ म्हणजेच बेसन हा अनेक तिखट आणि गोड पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा मुख्य पदार्थ आहे. चण्यामध्ये मानवी शरीराला रक्ताल्पता, रक्तातील साखर, हाडांचे आरोग्य इत्यादी गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी आवश्यक असलेले तंतुमय पदार्थ, लोह,पोटॅशियम, बी जीवनसत्त्व, सेलेनियम, बीटा कॅरोटीन आणि कोलीन इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्यामुळे चण्याला विविध पोषक आरोग्यदायी लाभ देणारे कडधान्य म्हटले जाते.