विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार ३० मे रोजी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रिक्त पदांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून, ते लवकरात लवकर भरले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या अनेक राज्यांमधील प्रबळ नेत्यांनी पदे सोडली आहेत. अनेकांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीत बोलावण्यात आले आहे. काही नेते अजूनही थांबा आणि वाट पाहाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यता वाढल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेच्या उपाध्यक्षपदाबाबतही विचार झालेला नाही. २५ मे २०१९ रोजी एआयएडीएमकेचे खासदार एम. थंबीदुरई यांनी पद सोडले होते. पक्षाचे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, बहुप्रतीक्षित कॅबिनेटचा विस्तार किंवा फेरबेदल कधी होतील याचे अद्याप कोणतेच संकेत मिळालेले नाही. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर कॅबिनेटचा विस्तार किंवा फेरबदल होतील, अशी चर्चा होती.
काही मंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तसेच काहींचे निधन झाल्यामुळे कॅबिनेटमधील चार मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. एनडीएतून बाहेर पडलेल्या पक्षांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानेही पदे रिक्त आहेत. त्यांची अतिरिक्त जबाबदारी काही वरिष्ठ मंत्र्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण खात्यासह २०१९ पासून अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार आहे.
लोजपाचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर ऑक्टोबरपासून ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आहे. पासवान यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमडळामध्ये एकही भाजपेतर मंत्री नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हेच फक्त राज्यमंत्री उरले आहेत.
अशाच प्रकारे कृषी, ग्रामीण विकास आणि पंचायती राज असे तीन मंत्रालय सांभाळणारे नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिलेल्या खाद्य मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे श्रीपाद नाईक यांच्या आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. जानेवारीमध्ये एका रस्ता अपघातात श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले होते. ते सध्या पूर्णपणे बरे झालेले नाहीत. केंद्र सरकारने सध्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.