नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीय कंपन्या आणि नागरिकांचे पैसे २०२१ अखेरपर्यंत ५० टक्क्यांनी वाढले आहेत. ही माहिती स्वित्झर्लंड येथील केंद्रीय बँकेने (एसएनबी) ने गुरुवारी जाहीर केली आहे. परदेशातील बँकांमधील काळा पैसा भारतात परत आणण्याचे वचन देणाऱ्या आणि नोटबंदीसारखे निर्णय घेत काळा पैसा नष्ट होईल, असा दावा करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्याच काळात परदेशातील बँकांमध्ये भारतीयांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीय कंपन्या आणि नागरिकांच्या पैशांत २०२१ मध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, हा पैसा गेल्या १४ वर्षांच्या सर्वोच्च ३.८३ स्विस फ्रँक (३०,५०० कोटी रुपयांहून अधिक) पातळीवर पोहोचला आहे. एसएनबीने गुरुवारी वार्षिक आकडेवारी जाहीर केली. यामध्ये भारतातील स्विस बँकांच्या शाखांसह वित्तीय संस्थांचा समावेश आहे. भारतीयांनी रोख्यांमध्ये भागभांडवल वाढवून आणि त्याच्याशी संबंधित वस्तूंद्वारे ग्राहकांच्या ठेवी वाढल्याने हा पैसा वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये २०२० च्या अखेरपर्यंत भारतीयांचे २.५५ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच २०,७०० कोटी रुपये होते. या आकडेवारीनुसार, स्वित्झर्लंडच्या बँकांवर २०२१ अखेरपर्यंत भारतीय ग्राहकांचे एकूण दायित्व ३८३.१९ कोटी स्विस फ्रँक होते. यापैकी ६०.२० कोटी फ्रँक ग्राहकांच्या ठेवी आहेत. १२२.५ कोटी स्विस फ्रँक इतर बँकांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या ठेवी आहेत. ट्रस्ट आदीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या ३० लाख फ्रँकच्या ठेवी आहेत.
स्वित्झर्लंडमधील बँकांनी ही आकडेवारी केंद्रीय बँक एसएनबीला दिली आहे. स्विस बँकेत भारतीयांकडून ठेवण्यात आलेला हा पैसा कथित काळा पैसा नाही. भारतीयांकडून आणि अनिवासी भारतीयांकडून किंवा इतर देशांच्या नागरिकांकडून तिसऱ्या देशातील कंपन्यांच्या नावाने स्विस बँकेत जमा करण्यात आलेला हा पैसा नाही, असे स्पष्टीकरण एसएनबीने दिले आहे.
भारतीय नागरिकांनी आपल्या बँकेत ठेवलेला पैसा हा ‘काळा पैसा’ आहे असे स्विस सरकार मानत नाही. स्वित्झर्लंडने करचोरीविरोधातील लढाईमध्ये नेहमीच भारताला सक्रिय पाठिंबा दिला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. भारत आणि स्वित्झर्लंडदरम्यान २०१८ सालापासून करचोरीच्या माहितीचे अदान-प्रदान करण्याची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय ज्या भारतीय नागरिकावर संशय आहे, अशा नागरिकांच्या बँकेच्या खात्याची माहिती प्राथमिक पुरावा म्हणून स्विस सरकार उपलब्ध करून देते.
स्विस बँकांमध्ये ब्रिटनच्या नागरिकांच्या सर्वाधिक ३७९ अब्ज फ्रँक ठेवी आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या ग्राहकांच्या १६८ अब्ज फ्रँक ठेवी आहेत. स्विस बँकांमध्ये फक्त अमेरिका आणि ब्रिटेनच्याच १०० अब्ज फ्रँकपेक्षा अधिकच्या ठेवी फक्त आहेत. स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या देशांच्या यादीत वेस्टइंडीज, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, हाँगकाँग, लक्झमबर्ग, बहामास, नेदरर्लंड, केमन आयलँड, सायप्रस या देशांचा समावेश आहे. या यादीमध्ये भारताचा ४४ वा क्रमांक आहे. भारतानंतर पोलंड, स्वीडन, बांगलादेश आणि पाकिस्तानसारख्या देशांचा क्रमांक लागतो.