नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे दोन कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पहिली गोष्ट म्हणजे, परदेशात त्यांचा अधिकाधिक वेळ औपचारिक चर्चा आणि लोकांच्या भेटीगाठीत जातो. आणि दुसरी म्हणजे लांबच्या थकविणार्या प्रवासाचे त्यांच्या चेहर्यावर लवलेशही नसते. मायदेशी परतताच ते कामाला लागतात. पंतप्रधानांचा कार्यक्रम व्यग्र असणे हे कारण थोडे विचित्र वाटेल पण न थांबता बैठकांमध्ये सहभागी होण्याकडे पंतप्रधानांचा भर असतो.
अमेरिकेच्या ६५ तासांच्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी वीस बैठकांमध्ये सहभाग घेतला. २२ सप्टेंबरला ते दिल्लीहून अमेरिकेकडे रवाना झाले होते. विमानातच त्यांनी अधिकार्यांसोबत दोन बैठका घेतल्या. २३ सप्टेंबरला हॉटेलमध्ये पुन्हा तीन बैठका झाल्या. भारतात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी त्याच दिवशी अनेक कंपन्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांसोबत त्यांनी बैठका केल्या. त्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा केली. दुसर्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चा केली. २४ सप्टेंबरला पंतप्रधानांनी भारतीय अधिकार्यांसोबत इतर चार बैठका घेतल्या.
मुख्यमंत्री असतानाही
पंतप्रधान मोदी आपल्या दिनचर्येतून थकवा घालविण्यासाठी मार्ग काढतात. त्यांची ही सवय खूपच जुनी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत जाताना ते फिरण्यासाठी तसेच कामकाजासाठी अधिक वेळ मिळावा अशाच व्यग्र कार्यक्रमाचे ते नियोजन करत होते. ते प्रवासासाठी रात्रीचाच वेळ निवडतात. हॉटेलमधील निवास खर्च वाचविणे आणि वेळेची बचत करणे हा त्यामागील उद्देश आहे. पंतप्रधान झाल्यानंतरही प्रत्येक प्रवासात त्यांनी असेच नियोजन केले आहे. तीन ते चार देशांच्या दौर्यादरम्यान ते तीन ते चार हॉटेलमध्ये मुक्काम करतात. तर इतर रात्र प्रवासात घालविण्याचे नियोजन करतात.
नियोजन असे ठरते
ज्या देशात पोहोचायचे आहे, तेथील वेळेनुसार ते विमानात आराम करतात. थकव्याचा परिणाम कमी दिसावा यासाठी ते प्रवासादरम्यान जास्तीत जास्त पाणी पितात. याच कारणांमुळे ते मायदेशी परतल्यानंतर लगेच कामाला लागतात. रविवारी मायदेशी परतल्यानंतर त्यांनी इतर बैठकांसह केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली.