नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज घेऊन या बँकांना गंडा घालणाऱ्या नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव करण्यात आला आहे. ही मालमत्ता जप्त करत त्यांची विक्री करण्यात आली असून ८ हजार ४४१ कोटी रुपये ईडीने बँकांना परत केले आहेत.
मोदी, चोक्सी आणि मल्ल्या या तिन्ही बड्या उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती. या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तिघांची मिळून १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. या तिन्ही उद्योगपतींनी २३ हजार कोटी रुपयांचा गंडा बँकाना घातला आहे. ईडीया कारवाईनंतर या घोटाळ्यांपैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये बँकांना परत मिळाले आहेत.
जुलै २०२२मध्ये नीरव मोदी यांच्या आणखी काही मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना समजली होती. त्यानंतर ईडीने नीरव मोदीची २६५० कोटी ७० लाख रुपयांची हाँगकाँगमधील मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर लिलाव करण्यात ईडीला यश आले आहे. अलीकडे करण्यात आलेल्या लिलावातून एकूण ८ हजार ४४१ कोटी रुपये ईडीला मिळाले आहेत. गेल्या १५ वर्षात ईडीने मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत १७०० प्रकरणांमध्ये कारवाई केली असून तब्बल १ लाख कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
हजारो कोटींचे घोटाळे
लंडनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने त्याच्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी स्टेट बँकप्रणित ११ बँकांकडून कर्ज बुडवले होते. या बँकांचे त्यामुळे ६२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच ९ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा ठपकादेखील मल्ल्यावर आहे. नीरव मोदी हा हिऱ्याचा व्यापारी असून त्याने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५७८ कोटी रुपयांचा गंडा घातला असून तो लंडनमध्ये कैदेत आहे. त्याचा भाचा मेहुल चोक्सी यानेदेखील पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातला आहे.
Fraud Cheating Crime Nirav Modi Mehul Choksi Vijay Mallya Property Auctioned ED