नवी दिल्ली – नागरी उड्डाण मंत्रालय (MoCA) आणि नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांनी १० संस्थांना मानवरहित विमान प्रणाली (UAS) नियम, 2021 मधून सशर्त सूट दिली आहे. म्हणजे, या संस्थांना ड्रोन वापरता येणार आहेत. या दहा संस्थांमध्ये महाराष्ट्रातील चार संस्थांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या आदिवासी भागात आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रायोगिक BVLOS ड्रोन उड्डाणे आयोजित करण्यासाठी मुंबईच्या नॅशनल हेल्थ मिशन (राष्ट्रीय आरोग्य अभियान) ची निवड झाली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात अनुक्रमे भात आणि मिरी पिकावर ड्रोन आधारित कृषी चाचण्या आणि अचूक फवारणीसाठी मुंबईच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. ड्रोन आधारित कृषी संशोधन उपक्रम आणि कृषी फवारणीसाठी मुंबईच्या बायर क्रॉप सायन्सची निवड करण्यात आली आहे.
भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम)ला भोपाळ, एनडीए, पुणे, कराड विमानतळ, उस्मानाबाद विमानतळ, मोहम्मद एअरफील्ड, फर्रुखाबाद या ५ ठिकाणी परवानगी मिळाली आहे. ही परवानगी मंजुरीच्या तारखेपासून किंवा पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी वैध आहे आणि डीजीसीएने जारी केलेल्या मानक नियमावलीच्या अटी व शर्तींच्या अधीन असेल.