अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही तुमच्या मोबाईलचे हॉटस्पॉट ऑन करून अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून वायफाय देता का? असे करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळेच श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सर्व इंटरनेट वापरकर्त्यांना अनोळखी, अराजक घटक आणि गुन्हेगारांना वायफाय किंवा हॉटस्पॉट न देण्याची विनंती केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, जर असे वायफाय किंवा हॉटस्पॉट गुन्हेगार, दहशतवादी आणि त्यांचे साथीदार वापरत असल्याचे आढळून आले तर इंटरनेट देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सर्व इंटरनेट वापरकर्त्यांना विनंती करण्यात येते की, अनोळखी, अराजक घटक, गुन्हेगार यांना वायफाय किंवा हॉटस्पॉट देऊ नका. हॉटस्पॉट किंवा वायफायसाठी सुरक्षित पासवर्डसह ठेवा. जर असे वायफाय किंवा हॉटस्पॉट गुन्हेगारांकडून वापरले जात असेल, तर दहशतवादी आणि त्यांचे सहकारी, इंटरनेट पुरवठादारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
जवळपास प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हॉटस्पॉट वायफायची सुविधा असते. याच्या मदतीने एक मोबाईल एकाच वेळी इतर अनेक मोबाईल लॅपटॉप इत्यादींना इंटरनेट सुविधा देऊ शकतो. अशा परिस्थितीत, पोलिसांनी तुमच्या हॉटस्पॉटच्या गैरवापरापासून सावधगिरी बाळगली आहे कारण दहशतवादी आणि त्यांचे साथीदार अशा प्रकारे इंटरनेटचा वापर करून तुम्हाला अडचणीत आणू शकतात.
याआधी सोमवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रेल्वे सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता तर अन्य एक जखमी झाला होता. गेल्या काही दिवसांत दहशतवादी हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या चकमकीत अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी जानेवारीपासून ४५ दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवादी कारवाया पाहता नागरिकांनी सुरक्षित राहण्याची गरज आहे. त्यामुळे इंटरनेटसारख्या सुविधा अनोळखी व्यक्तींना पुरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.