नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आज अतिशय थरारक पाठलाग करीत सराईत मोबाईल चोरास जेरबंद केले आहे. त्याद्वारे मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. चोराकडून तब्बल 20 मोबाईलसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मोबाईल चोरांचा छडा लावण्यासांठी त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या माध्यमातून सातपूर पोलिसांनी दोन सराईत मोबाईल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 20 मोबाईलसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
मोबाईल चोर हा अंबिका स्वीट, अशोक नगरकडे रविवारी (दि. 24) येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून राजेंद्र कुल्लू ठाकुर (वय 24) यास मोटरसायकल सह ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मोबाईल चोरीचा गुन्हा कबुल केला व आपले आणखी साथीदार असल्याचे सांगितले. चोरलेले मोबाईल हे ज्या विक्री व दुरुस्ती करणार्यास विकले होते, त्या किरण गंगाळे या मोबाईल विक्रेत्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 20 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. यासह मोटसायकल असा एकुण 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात मुख्य आरोपी राजेंद्र कुल्लू ठाकूर (24) व मोबाइल खरेदी-विक्रेता किरण गंगाळे यासह दोन विधी संघर्षित बालक यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली वपोनि महेंद्र चव्हाण व अधिकारी करीत आहे.