मुंबई – आर्थिक गुन्हेगार, आपत्तीजनक कॉल, स्वचलित कॉल आणि फसवणुकीसंदर्भातील घटनांच्या चौकशीसाठी दूरसंचार विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दूरसंचार विभागाने एकपेक्षा अधिक सिमकार्ड बाळगणार्या ग्राहकांना आता सिमची पडताळणी करावी लागणार आहे.
दूरसंचार विभागाने नऊपेक्षा अधिक सिमकार्ड बाळगणार्या ग्राहकांना सिमकार्ड पडताळणी करण्याचे तसेच पडताळणी न केल्यास सिम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीर आणि आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये सहा सिमकार्डची पडताळणी करावी लागणार आहे. नियमांनुसार वापरात नसलेले सिमकार्ड डेटाबेसमधून हटवावेत, असे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत.
दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, ग्राहकांजवळ परवानगीपेक्षा अधिक सिमकार्ड आढळले तर त्यांना आपल्या आवडीनुसार सिम सुरू ठेवण्याचा आणि इतर सिम बंद करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. जर कोणत्याही ग्राहकाजवळ सर्व दूरसंचार सेवा देणार्या कंपन्यांचे सिमकार्ड निर्धारित संख्येपेक्षा अधिक असेल तर सर्व सिमकार्डची पडताळणी पुन्हा केली जाणार आहे.