नागपूर – मोबाइलचा स्फोट झाल्याच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल. या घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. युजर्सच्या वापरण्याच्या पद्धतींवर मोबाइला आग लागण्याचे कारण अवलंबून असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजकाल बाजारात येणार्या सर्व मोबाइलना ४००० ते ५००० एमएएचची बॅटरी दिली जाते. त्यामुळे अशा फोन्सचा वापर खूपच काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. मोबाइल फोन्सचा स्फोट का होतो त्याची कारणे आपण जाणून घेणार आहोत.
मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी नकली चार्जरचा वापर करू नये. नकली चार्जरमुळे बॅटरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बॅटरीवर जास्त दबाव येतो. त्यामुळे तो गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. फोनसोबत मिळणार्या चार्जरचा नेहमीच वापर करावा.
चार्जर खराब झाल्यावर मूळ कंपन्यांचेच चार्जर खरेदी करणे आवश्यक आहे. फोनचा वापर जास्त केल्यास तो असामान्य स्थितीत खूप तापतो. त्यानंतर फोनचा वापर करणे टाळावे. फोन तापल्यानंतर तो चार्जिंग करत असाल तर त्वरित प्लगपासून तो वेगळा करावा. नसता त्याचा स्फोट होऊ शकतो.
ड्राइव्हिंग करताना फोन चार्जिंग अॅडॉप्टरमध्ये लावणे टाळावे. असे केल्यास अचानक विजेच्या पुरवठ्यात उसळी घेऊन फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो. शक्यतो ड्रायव्हिंग करताना पॉवर बँकेद्वारे फोन चार्ज करणे योग्य ठरेल.
मोबाइल खराब झाल्यास कोणत्याही स्थानिक केंद्रातून मोबाइलची दुरुस्ती करू नये. अनेक वेळा दुरुस्ती करणारे फोनमध्ये नादुरुस्त पार्ट इन्स्टॉल करू शकतात. त्यामुळे फोनचा आउटपूट खूपच स्लो होतो. त्याशिवाय तो खूपच तापण्यास सुरुवात होते. फोन खराब झाल्यास तो कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर दुरुस्त करणे हिताचे ठरेल.