नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदींवरील भोंग्यांबाबत ३ मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्याची दखल पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी घेतली आहे. आज शहर परिसरात साजरी होणारी रमजान ईद आणि अक्षय तृतीया या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर आणि मनसेचा अल्टिमेटम म्हणून शहरात तब्बल ३ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिक शहरात त्र्यंबकरोड लगत ईदगाह मैदान आहे. याच मैदानावर सामुहिक नमाज पठण होते. तसेच, याच मैदानासमोर मनसेचे नाशिक कार्यालय आहे. त्यामुळे याची दखल घेत नाशिक पोलिसांनी मनसे कार्यालयासह मैदानाच्या बाहेर अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे की, ३ मे नंतर मशिदींवरील भोंगे उतरविले नाही तर ४ मे पासून मशिदींच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावला जाईल. यामुळे शहरात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. शहरात पोलिस स्टेशननिहाय बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वानपथक, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद बाबींकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. ईद आणि अक्षय तृतीया हे दोन्ही सण शांततेत संपन्न व्हावेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिला आहे.